आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीने १२ व्यक्तींची नियमानुसार निवड केली. त्याबाबत राज्यपाल आपल्या अधिकारांचा वापर करून त्यांची नियुक्ती करतील. मात्र, ते आम्हाला न्यायालयात जाऊ देणार नाहीत, असे वाटते. याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत, अशी उपरोधिक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
ठाकरे सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची शिफारस केली असून त्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्यापही मंजुरी दिलेली नाही. यासंदर्भात अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटकांबाबत घडलेली घटना आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्याबाबत जो भावुकपणा दाखविला, तो योग्य आहे. मात्र, हाच भावुकपणा दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांबाबत दाखवला असता तर चांगले झाले असते, असा टोलाही उपमुख्यमंत्र्यांनी लगावला.
दुसरे उपमुख्यमंत्रिपद नाही : दुसऱ्या उपमुख्यमंत्रिपदाच्या बातम्या तथ्यहीन आहेत. आघाडी स्थापन झाली त्या वेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून सर्वकाही ठरवले आहे.
ईव्हीएम बंद होणार नाही : निवडणुकांमध्ये ईव्हीएम बंद होणार अशी चर्चा असली तरी ते बंद होणार नाही. उलट या मशीनमुळे लवकर मतमोजणी होऊन आकडेही बरोबर येतात. पराभूत व्यक्तीला मशीन घोटाळा झाला हे सांगण्याचे कारणही मिळते, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.