आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नचिन्ह:नाशिकच्या संमेलनाचा नाही पत्ता, नागपूरच्या संमेलनाची तयारी सुरू!

नाशिक / पीयूष नाशिककरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संमेलन हाेऊच नये यासाठीही काही जण विशेष प्रयत्न करत असल्याचीही चर्चा

नाशिकला ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेत आहे की नाही याबद्दलच अद्याप साशंकता असताना महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाकडून पुढील संमेलन नागपूर येथे घेण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. नाशिकमध्ये संमेलन हाेऊच नये यासाठीही काही जण विशेष प्रयत्न करत असल्याचीही चर्चा असल्याने नाशिकच्या संमेलनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.

नाशिकला मार्च महिन्याच्या ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेणार हाेते. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे संमेलन रहित करण्यात आले. हे संमेलन पावसाळा किंवा आॅक्टाेबर-नाेव्हेंबर महिन्यात घेऊ अशी तयारी आयाेजकांनी केली हाेती. किंबहुना केली आहे. मात्र साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाच्या ललित लेखात नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या आर्थिक बाबींवर परखडपणे बाेट ठेवल्याने नाशिकचे संमेलन वादात सापडले. नाशिकचे संमेलन जाहीर करण्यासाठी जेव्हा बैठक झाली त्याच वेळी ९५वे साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संघाकडे अर्थात नागपूरमध्ये घेण्यात येणार असल्याचा शब्द देण्यात आला हाेता. त्यानुसार आता पुढील संमेलनासाठी नागपूरकरांनी तयारी केल्याचेही समजते. त्यासाठी जागा बघा, आर्थिक नियाेजनाच्या सूचना यासंदर्भात बाेलणी झाल्याचेही कळते. मग नागपुरातच नाशिकचेच संमेलन घ्यायचे, ९४ वे संमेलन रहित करून ९५ वे घ्यायचे की ९४ वेच संमेलन पुढे घ्यायचे याबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू असल्याचेही समजते.

नागपुरातही रंगणार अध्यक्षपदाचा वाद : नाशिकच्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांना बसवण्याची तयारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा चांगलीच रंगली हाेती. मात्र जेव्हा साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांचे पदाधिकारी एकत्र बसले त्या वेळी मसाप, पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी डाॅ. जयंत नारळीकरांच्या बाजूने कल दिला. त्याला मराठवाड्यातील काही पदाधिकाऱ्यांनीही सहमती दिल्याची चर्चा चांगलीच रंगली आणि त्यामुळेच डाॅ. नारळीकरांच्या नावावर शिक्कामाेर्तब झाले आणि भारत सासणेंची ही संधीही पुन्हा हुकली.

महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाचे संमेलनासाठी प्रयत्न
...म्हणून नागपूरला ९५ वे संमेलन

१४ जानेवारी १९२३ राेजी विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली हाेती. स्थापनेच्या दिवशीच १३ व १४ जानेवारी १९२३ रोजी विदर्भ साहित्य संघाचे पहिले संमेलन झाले. अध्यक्षस्थानी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर होते. त्यामुळे २०२२ मध्ये विदर्भ साहित्य संघ शतकमहाेत्सवी वर्ष साजरा करण्याला सुरुवात करणार आहे. याचे आैचित्य साधून नागपूरच्या साहित्यिकांना, साहित्यरसिकांना आणि संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही शतक महाेत्सवाची सुरुवात साहित्य संमेलनाने व्हावी असे वाटते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले आणि ते फळासही येण्याची चिन्हे आहेत.

निवडणुकांमुळे आटापिटा
फेब्रुवारी महिन्यात नाशिक, नागपूर येथे महापालिकेच्या निवडणुका हाेण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने नाशिकमध्ये संमेलन घेण्यात येणार हाेते. अर्थातच त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आणि त्याअनुषंगाने शक्ती दाखवण्याचा प्रयत्न आहेच. म्हणूनच आॅक्टाेबर किंवा नाेव्हेंबर २०२१ मध्ये नाशिकचे ९४ वे संमेलन काेणत्याही परिस्थितीत घेऊच, असे आयाेजक सांगत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती नागपूरमध्येही आहे. त्यामुळेच नागपूरमध्ये संमेलन हाेऊ शकते, अशी चर्चा साहित्यवर्तुळात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...