आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सपाेझ:3000 प्रवासी संख्या वाढूनही अलायन्स एअर कडून विमानसेवा बंद

संजय भड | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक विमानतळावरून ‘अलायन्स एअर’कडून सुरू असलेली चार प्रमुख शहरांची सेवा बंद झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार कंपनीने प्रवासी संख्या कमी असल्याची माहिती दिल्याचे सांगितले. वास्तवात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात तीन हजारावर प्रवासी नाशिक विमानतळाहून वाढल्याची आकडेवारी ‘दिव्य मराठी’ला मिळाली आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळेच ही विमानसेवा अचानक बंद झाल्याचा संशय नाशिककरांमध्ये बाेलला जात आहे.

अलायन्स एअरकडून नाशिक, अहमदाबाद, पुणे, बेळगाव आणि दिल्ली या चार शहरांकरिता सुरू असलेली विमानसेवा अचानक एक नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे. नियमित आणि पुरेशा प्रवाशांसह सेवा सुरू असताना व पुढील काही महिन्यांचे शेड्यूलदेखील कंपनीने डीजीसीएकडून मंजूर करून घेतलेले असताना तसेच प्रवाशांची तिकीट बुकिंगही करून घेतली असतानादेखील अचानक ही सेवा बंद करण्यात आली.

विशेष म्हणजे ३० ऑक्टोबरपासून याच उडान योजनेंंतर्गत ग्वाल्हेर-इंदोर -गाझियाबाद अशी नवी सेवा सुरू झाली. जी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे नाशिकची विमाने इतरत्र पळवली गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. याचमुळे आपल्या लोकप्रतिनिधींचे केंद्रात किती वजन आहे? आणि शहरासाठी ते काय धडपड करतात याचीही चर्चा आता शहरवासीयांमध्ये हाेऊ लागली आहे.

एक महिन्यात ३ हजाराने प्रवासी वाढले
एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेतील माहितीनुसार अलायन्स एअर या कंपनीने पुरेशी प्रवासी मिळत नसल्याने सेवा बंद केल्याचे व्यावसायिक कारण दिले असल्याचे म्हटले होते. वास्तवात सप्टेंबर महिन्यात नाशिक विमानतळावरून १२९७० प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला होता. तोच ऑक्टोबर महिन्यात १६००७ प्रवाशांनी घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ पुन्हा एकदा नाशिकला क्षमता असूनही बदनाम करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा संशय व्यक्त होऊ लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...