आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूजीसीचे आदेश:अर्धवेळ पीएच.डी.ला परवानगी; एम. फिल अभ्यासक्रम यंदापासून बंद

किशोर वाघ | नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांपासून मागणी आणि प्रतीक्षा सलेल्या अर्धवेळ पीएच.डी.ला अखेर यंदापासून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पीएच. डी. शिक्षणक्रम पूर्ण करण्याचे आपले ध्येय साध्य करता येणार आहे. दरम्यान, एम. फिल हा अभ्यासक्रम मात्र बंद करण्यात आला असून यंदापासून वर्ष २०२२-२३ मध्ये कुणालाही नव्याने प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश यूजीसीने सर्वच विद्यापीठांना दिले आहेत.

अर्धवेळ पीएच.डी. अभ्यासक्रम नियमावली निश्चितीसाठी विद्यापीठाच्या अकॅडमिक काैन्सिलची २० डिसेंबरला बैठक आयोजित केली आहे.यूजीसीच्या नव्या नियमांनुसार विद्यापीठे आणि संलग्न संशोधन केंद्रांमध्ये अर्धवेळ पीएच. डी. अभ्यासक्रम ही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याने काम करुन पीएच. डी. करू इच्छिणाऱ्यांना आता आपले स्वप्नपूर्तीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

पूर्णवेळ पीएच.डी.च्या अटी मात्र लागू
अर्धवेळ पीएच. डी. अभ्यासक्रमाला मान्यता दिली असली तरीही प्रवेशासाठी पूर्णवेळ पीएच.डी.च्या अटी लागू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेशासाठी २ वर्षे कालावधी असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानंतर प्रवेश दिला जाईल.

गाइडची वयोमर्यादा ७० वर्षे
यूजीसीच्या नव्या नियमांनुसार पीएच.डी. गाइडची वयोमर्यादा ६५ वर्षे वयावरून पाच वर्षाने वाढवून ७० वर्षे वय करण्यात आली आहे. केंद्रीय संस्थांमध्ये प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. त्यात त्यांना पुढील ३ वर्षे म्हणजे ६५ वयापर्यंत पीएच. डी. गाइडचे काम करता येते. आता त्यात वाढ झाली आहे.

पूर्णवेळ, अर्धवेळ म्हणजे नेमके काय
पूर्णवेळ पीएच. डी. म्हणजे जीआरएफ घेऊन काम करणारे पूर्णवेळ संशोधन करतात. त्यात बार्टी, सारथी व महाज्योतीद्वारे फेलोशिप घेऊन काम केले जाते. तर अर्धवेळ म्हणजे प्राध्यापक किंवा कुठल्याही संस्थेत काम करताना पीएच. डी.साठी प्रवेश घेत वेळ मिळेलत तसे संशोधन काम पूर्ण केले जाते.

शोधनिबंधाच्या प्रसिद्धीची अटही रद्द
शोधनिबंध हा संशोधन पत्रिकांमध्ये प्रसिद्ध कऱण्याची पूर्वी अट होती. त्यानुसार अनेक संशोधक बोगस पत्रिकांमध्ये प्रसिद्ध करत असल्याचे उघडकीस आल्याने आता यूजीसीने शोध निंबध प्रसिद्धीची अटच रद्द केली आहे.

यूजीसी सूचनांनुसार नियमावली
यूजीसीने अर्धवेळ पीएच.डी.ला मान्यता दिली आहे. २० डिसेंबरला हाेणाऱ्या अकॅडमिक काैन्सिलच्या बैठकीत याबाबतची नियमावली यूजीसीने दिलेल्या सूचनांनुसार तयार हाेईल. एम. फिलचेही प्रवेश यंदापासून बंद होतील. - प्रा. प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू, फुले विद्यापीठ

महत्वाचे नियम
अर्धवेळ पीएचडी करणाऱ्यांना ते काम करत असलेल्या आस्थापना प्रमुखांचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यात अभ्यासाठी वेळ देणार का? गरज पडल्यास पीएच. डी.साठी सुटी देणार का? या सर्व बाबींची हमी द्यावी लागेल.

नव्या नियमानुसार ५० टक्के अभ्यासक्रमाचा भार संबंधित विषयावर असेल. आणि ५० टक्के भार हा संशोधन पध्दतीवर राहाणार आहे.

एम. फिल. बंद केल्याने आता ‘पेट’द्वारे प्रवेश दिले जातील. प्रवेशाच्या प्रक्रीयेत कुठलाही बदल केला नाही.

बातम्या आणखी आहेत...