आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइतिहासातून नेहमी प्रेरणा घेतली पाहिजे. एकमेकांच्या वादात महापुरुषांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व झाकोळण्यापेक्षा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून रोजच्या राजकारणात छत्रपतींना आणू नका, प्रतिक्रियेपेक्षा कृती महत्त्वाची असल्याने इतिहासाचा अभिमान वाटेल, असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, असे परखड मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाशिक येथे बोलताना व्यक्त केले.
शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या आयोजन नाशिकमध्ये 21 ते 26 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या महानाट्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाशिक मध्ये भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून ते बलिदानापर्यंत स्वराज्याचा ध्यास घेतला होता. त्यांचे कार्यकर्तृत्व प्रचंड मोठे होते. म्हणूनच त्यांना दिलेली स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक आहे.
कुणाच्याही शिवभक्तीविषयी शंका नाही
अमोल कोल्हे म्हणाले, मी कधीही कोणाच्या शिवभक्ती विषयी शंका घेत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या प्रत्येकाचे कार्य माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मी प्रतिक्रिया देण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व देतो. त्यामुळे एकमेकांच्या वादात छत्रपतींचे कार्य झाकोळण्यापेक्षा त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे जास्त महत्त्वाचे आहे, असेही कोल्हे म्हणाले.
छत्रपतींची तुलना कोणाशी होऊ शकत नाही
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे इतिहासाचा अभिमान वाटेल असे कार्य प्रत्येकाने करायला हवे. छत्रपतींना दिलेली कोणतीही उपमा कोणीही आपल्या नेत्यांना देऊ नये, ते त्या नेत्यांनाही आवडणार नाही, असेही डॉ. कोल्हे म्हणाले. राजकारण्यांनी महागाई, बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे. रोजच्या राजकारणात महापुरुषांना आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
21 जानेवारीपासून 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य
नाशिकमध्ये 21 ते 26 जानेवारी या कालावधीत सायंकाळी 6 वाजता तपोवन येथील मोदी मैदानात शिवपुत्र संभाजी महानाट्य सादर होणार आहे. 18 एकर परिसरात तीन मजली सेट, घोडे ताफा आणि सुमारे 200 कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होईल. तसेच या ठिकाणी शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे. मैदानी खेळ, गडकिल्ल्यांची माहिती, शस्र यांची माहिती या ठिकाणी असेल.
या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा इतिहास तीन तासांत सादर केला जाईल. या महानाट्यासाठी दहा हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बुक माय शो तसेच शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरासह इतर चार ठिकाणी तिकीट उपलब्ध असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.