आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • An Offering Of 56 Pieces Of Special Cloth From Vrindavan To Radharani; Radhashtami ISKCON Temple Decorated With Banana Leaves, Shevanti Flowers| Marathi News

उत्साहात साजरा:राधाराणीला वृंदावनहून खास वस्त्र, ५६ भाेगाचा नैवेद्य अर्पण; राधाष्टमी इस्काॅन मंदिरात केळीची पाने, शेवंती फुलांनी सजावट

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) मंदिरात रविवारी (दि.४) श्री राधाष्टमी अर्थात म्हणजेच राधाराणीचा जन्मदिवस राधे राधेच्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. इस्काॅन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर साजरा करण्यात येणारा हा दुसरा मोठा महोत्सव असताे. यानिमित्त राधाराणीला खास वृंदावन येथून वस्त्र आणण्यात आले हाेते. सहा पुजाऱ्यांनी साजशृंगार केला हाेता. दुपारी १२ वाजता ५६ भोग राधाराणीला अर्पण करण्यात आले व महाआरती करण्यात आली.

मुंबई येथूून आलेले शिवराम प्रभू यांनी प्रवचनात सांगितले की, श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे कठीण आहे. परंतु राधाराणीची कृपा एखाद्या व्यक्तीवर झाली, तर त्या व्यक्तीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे सुलभ होते. राधाराणीच्या कृपेची याचना करीत जर कुणी अश्रू ढाळले, तर त्याला आयुष्यभर दुःखाश्रू ढाळावे लागणार नाही. राधाराणी व श्रीकृष्ण यांच्यातील प्रेम हे भौतिक स्तरावरील नसून आध्यात्मिक स्तरावरील आहे, याचेही वर्णन त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने केले. राधाष्टमीनिमित्त मंदिराची विशेष सजावट करण्यात आली होती. महोत्सवाला रविवारी सकाळी आरतीपासूनच सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जाप, दर्शन आरती व श्रीमद्भागवत प्रवचन झाले. राधाराणीचे गुणगान करणारे राधिकाष्टकमचे स्तवन तसेच अन्य व्रजभक्ती गीते सादर करण्यात आली. श्री श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांचा दुपारी पंचामृताने अभिषेक त्यानंतर महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. यावेळी भाविकांनी गर्दी केली हाेती. यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उत्सव समिती प्रमुख लीलाप्रेम प्रभू व अच्युत प्राण प्रभू, गोपालानंद प्रभू कृष्णभक्तांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...