आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक काेंडीवर उपाय:शहरात 22 नवीन सिग्नलसह मुंबईनाक्यावर हाेणार अंडरपास

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, पुण्याप्रमाणे नाशिक शहरातील वाहतूक काेंडी चिंतेचा विषय बनत असल्यामुळे अखेरीस प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग आली असून अनेक वर्षांपासून निद्रिस्त असलेल्या ट्रॅफिक सेलची बैठक घेत शहरात अपघातस्थळ असलेल्या २२ ठिकाणी नवीन सिग्नल उभारणे तसेच मुंबईनाक्यावर अंडरपास करण्यास मान्यता देण्यात आली.महत्त्वाच्या चौकांचे पुनर्नियोजन केले जाणार आहे. याबराेबरच बंद असलेले सात सिग्नल सुरू पुन्हा करून अपघात राेखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययाेजनांवर चर्चा झाली. मुंबईनाका चौकातील वाहतूक कोंडीचा वेगवेगळ्या वेळांचा व वेगवेगळ्या दिशेने शूट केलेला ड्रोन व्हिडिओ दाखवल्यानंतर येथे अंडरपासची गरज पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी व्यक्त केली. तसेच शहरातील प्रमुख चाैकांमध्ये दृश्यमानता महत्त्वाची असल्याचे सांगून तेथील सूचना फलक त्यांचे ठिकाण, रंग डिझाइन निश्चित करणे, विविध ठिकाणी वाहतूक नियोजन व पेट्रोलिंगच्या दृष्टीने पोलिस चौक्यांची ठिकाणे, डिझाइन, मिर्ची चौकातील टेम्पलेट याबाबत रेझिलिइंट कंपनीच्या तज्ज्ञांनी अहवाल द्यावा. त्यावर त्वरित काम केले जाईल, असे सांगितले. रेझिलिइंट इंडिया कंपनीचे राजीव चौबे यांनी पंधरा दिवसांत अपघातस्थळांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजनासंबंधीचा अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या.

या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता अविनाश देवरे, एनएचएआयकडून शशांक आडके, रेझिलिइंट इंडिया कंपनीचे राजीव चौबे, प्रियंका लखोटे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, उपायुक्त करुणा डहाळे, डॉ. विजयकुमार मुंढे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, नगर नियोजन विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, बांधकाम विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रा. डॉ. रवींद्र सोनोने उपस्थित होते.

नऊ महिन्यांत १०८ जणांचा बळी
वाहनांची वेगमर्यादा ३०ची असेल तर अपघातातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्के असते. मात्र, वेग ६० किलोमीटर प्रति तास असेल तर मृत्यूचे प्रमाण ९५ टक्के असते.विनाहेल्मेटमुळेही मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची माहिती दिल्यानंतर अपघातांची संख्या सांगितली.

जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत वेगात वाहन चालविल्यामुळे १८६ अपघात घडले असून ६० जणांचा बळी गेला आहे. तर, हेल्मेट परिधान न केल्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये ४८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

‘या’ तीन चौकांमध्ये उभारणार उड्डाणपूल
मिर्ची चौकासह औरंगाबादरोडवरील नांदूरनाका, सिद्धिविनायक चौक या तीन ठिकाणी उड्डाणपुलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...