आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान जयंती:हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरीत भक्तांची मांदियाळी, 'अंजनीपुत्र बजरंग बली की जय' जयघोषणांनी दुमदुमला परिसर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानाचे जन्मस्थळ असलेल्या अंजनेरी येथे मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे. 'अंजनीपुत्र बजरंग बली की जय' अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला आहे. हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजनेरी पर्वतावर भाविकांची मांदियाळी जमल्याचे दिसून येत आहे.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने अंजनेरी गावातील श्री सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. याठिकाणी असलेल्या 11 फुटी मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज पहाटे वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 6 वाजून 28 मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंजनेरीला दाखल होत असतात. यंदाही अंजनेरीत मोठा उत्साह दिसून येत आहे.

म्हणूनच 'अंजनेरी' हे नाव

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात नाशिक-त्र्यंबक मार्गावर हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेले अंजनेरी हे गाव आहे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे सांगितले जाते. म्हणूनच या किल्ल्यासह गावाला 'अंजनेरी' हे नाव देण्यात आले. या पर्वतावर अंजनी मातेचे मंदिर आहे. याठिकाणी बाल हनुमानाचे मूर्ती आहे.

जन्मस्थळामुळे पर्वताला विशेष महत्त्व

अंजनेरी पर्वतावर चढून जाणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे पर्वताच्या पायथ्याशी हनुमानाची मोठी 11 फुट मूर्ती आहे. भाविक या पायथ्याशीच दर्शन करतात. हनुमानाच्या जन्मस्थळामुळे अंजनेरी पर्वताला विशेष असे महत्त्व आहे.

जन्मस्थळावरुन वाद

काही महिन्यापूर्वी हनुमानाचे नेमके जन्मस्थळ कोणते यावरून वाद रंगला होता. कर्नाटक राज्यातील किष्किंधा येथे हनुमानाचा जन्म झाल्याचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी म्हटले होते. त्यानंतर हरियाणामधील कनखल, गुजरातमधील डांग, हरिद्वारमधील शेषाद्री पर्वत, तिरुपती येथील अंजनाद्री पर्वत अशा अनेक ठिकाणी हनुमान जन्माचा दावा केला जात आहे. मात्र अनेक धर्म पंडितांकडून नाशिक अंजनेरी पर्वत हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सांगितले जाते.