आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भोरवाडी पाड्यावरील महिलेला काही व्यक्तींनी भुताळीण (भुतीण) ठरवून पाड्यावर घडलेल्या घटनांना तिलाच जबाबदार धरून तिचे दैनंदिन जगणे मुश्किल करून टाकले हाेते. या बाबत अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी पाेलिसांच्या समक्ष त्यांच्यातील वाद शास्त्रीय पद्धतीने विवेचन करत मिटवला. यानंतर दाेन्ही बाजूंच्या महिलांना एकत्र आणल्याने सर्वांनी एकमेकांचे ताेंड गाेेड करत असा प्रकार गावात पुन्हा हाेणार नाही याची हमी दिली.
इगतपुरीतील भाेरपाड्यातील एक महिला करणी करत असल्यानेच गावावर अनेक संकटे आल्याचा आराेप काही जणांनी केला हाेता. यामुळे संबंधित महिलेला गावात राहणे मुश्किल झाले हाेते. त्याचा राग मनात ठेवून भुताळीण ठरवलेल्या महिलेनेही इतरांना दोष देणे सुरू केले हाेते. भुताटकी, मंत्र तंत्र, करणी, भानामती, जादूटोणा अशा अंधश्रद्धायुक्त अवैज्ञानिक गोष्टींवर आजही समाजात पारंपरिक समज दृढ असल्याने या महिलांमध्ये आपापसात मोठ्या प्रमाणात गैरसमज होऊन सातत्याने भांडणे झाली हाेती. ही माहिती महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने भोरवाडी पाड्यावर भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे अगोदर अंनिसच्या वतीने घोटी पोलिस ठाण्यात जाऊन रीतसर विनंती पत्र देण्यात आले. संबंधित महिलेला न्याय मिळावा, सर्वांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडेकर यांनी तातडीने कार्यकर्त्यांसमवेत एका सहकारी कर्मचाऱ्यास भोरवाडी पाड्यावर पाठवले. अंनिस व पाेलिसांनी दोन्ही बाजूंच्या महिला व पुरुषांना एकत्र आणून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. भुताळीण ठरवलेल्या महिलेला मंत्र, तंत्र, जादूटोणा येत असेल आणि त्यातून जर वाईट घडत असेल असा जर कोणाचा समज असेल तर तो समज दूर करण्यासाठी भुताळीण ठरवलेल्या महिलेने केलेला स्वयंपाक कार्यकर्त्यांनी सेवन केला. दोन्ही बाजूंकडील व्यक्तींनाही सेवन करण्याचे आवाहन केले. इतरांनीही ते अन्न आणि पाणी घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा व त्यांचे निर्मूलन याबद्दलचे शास्त्रीय विवेचन करून उपस्थितांच्या मनातील अंधश्रद्धेची जळमटं दूर केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.