आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik | Sathitya Samelan | Announcement By Receptionist Chhagan Bhujbal; Javed Akhtar Will Be The Chief Guest And Vishwas Patil Will Be The Inaugural Speaker

चर्चांना विराम:स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची घोषणा; संमेलनाला जावेद अख्तर प्रमुख पाहुणे, उद्घाटक विश्वास पाटील

प्रतिनिधी | नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी जाहीर केले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संमेलनाला कोण पाहुणे येणार, याची उत्कंठा आता शमली आहे.

नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात ३ ते ५ डिसेंबर दरम्यान हाेणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन काेण करणार यावरून बरीच चर्चा सुरू होती. ‘दिव्य मराठी’ने शनिवारच्या (दि. २०) अंकात पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन हाेणार असल्याचे प्रसिद्ध केले हाेते.

स्वागताध्यक्ष भुजबळ यांनीही उद्घाटक म्हणून पाटील यांचे नाव जाहीर करतानाच या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित राहणार असल्याचे संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी जाहीर केले. तर समाराेप कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे उपस्थित राहणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

उद्घाटक म्हणून अख्तर यांचे नाव सुरुवातीपासून घेण्यात येत होते. मात्र विविध स्तरांतून विरोध होत होता. मात्र त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले असून ते कार्यक्रमााला उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

शहर विद्रूपीकरण नको
शहर सजवा, फलक लावा असे सांगत असतानाच भुजबळ म्हणाले की, याचा अर्थ असा नाही की फार बॅनरबाजी करा. शहर विद्रूप व्हायला नकाे. ठराविक ठिकाणी साहित्याशी संबंधित, संमेलनासंबंधित फलक लावावे. आपण दिवाळी आपले घर जसे सजवताे तसे शहर सजवावे. ते विद्रूप दिसू नये याची काळजी घ्या.

‘भाषा म्हणजे आई, ती आपल्याला सांभाळते’
भाषा समाजाला बांधून ठेवते. आपली मराठी अभिजात भाषा आहे. म्हणून तिचे सर्व पुरावे केंद्राकडे सादर केले आहेत. ती समृद्ध व्हावी, लिहिली जावी, बाेलली जावी त्याचे एक माध्यम साहित्य संमेलन आहे. भाषा ही आईसारखी आहे, आई आपल्याला सांभाळते, आपण तिला सांभाळूया. हे साहित्य संमेलन सर्व पातळ्यांवर यशस्वी करूया, असे आवाहन भुजबळ यांनी संमेलनाच्या मुख्य सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केले. या वेळी शहराचे प्रथम नागरिक सतीश कुलकर्णी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होत्या.

आशा भोसले नाहीत
या संमेलनाच्या उद्घाटनाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र भुजबळ यांनी उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाला येणाऱ्या अतिथींची नावे जाहीर केली. त्यात आशा भोसले यांचे नाव घेतले नसल्याने त्या संमेलनाला येणार नसल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

मराठीच्या अभिजात दर्जासाठी पाठपुरावा सुरू : पवार
पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्यासाठी सर्वताेपरी पाठपुरावा सुरूच आहे. आम्ही संसदेत आवर्जून मराठी बाेलताे. आपले मुद्दे आपल्या भाषेत मांडताना आत्मविश्वासही येताे. त्यामुळेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महाराष्ट्रातील खासदारांचे खास पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. आता या संमेलनाच्या निमित्ताने मराठीच्या अभिजाततेचा मुद्दा चर्चेला येणारच आहे.

महापालिकेकडून २४ लाखांचा निधी
साहित्य संमेलनासाठी महापालिकेकडे संमेलनाच्या आयाेजकांनी ५० लाख रुपयांचा निधी मागितला हाेता. मात्र पालिकेच्या नियमानुसार पालिकेला केवळ २ लाख रुपये निधी देता येताे. अधिकचा निधी देण्यासाठी पालिकेकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला हाेता. या प्रस्तावाला मंत्रिमहोदयांनी मंजुरी दिली असून त्यानुसार आता महापालिकेकडूून साहित्य संमेलनासाठी २४ लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याचे या वेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...