आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक चूक:यादी अपलोड न झाल्याने इच्छुकांना मनः स्ताप

नाशिकएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनपाच्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीमध्ये घोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धीची ऑनलाइन प्रक्रिया गुरुवारी न होऊ शकल्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांनी संताप व्यक्त केला. पालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या साइटवर अडचणी असल्यामुळे ऑनलाइन मतदार यादी प्रसिद्धीसाठी अपलोड होऊ शकली नाही, असा दावा केला आहे. दरम्यान, यामागे खरे कारण चर्चेत आले असून प्रभाग क्रमांक १८ व ३६ या दोन प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये तांत्रिक चुका झाल्यामुळे लगतच्या सहा प्रभागांमध्ये घोळ झाल्याचे वृत्त आहे.

पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत झाली असून गुरुवारी (दि. २३) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या विधानसभानिहाय मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभागणी अचूक व वेळेत करणे गरजेचे होते. किंबहुना हे काम करताना सोयीचे मतदार अन्य प्रभागांतून आपला प्रभाव क्षेत्रातील प्रभागात घुसवण्याचे उद्योगदेखील होऊ शकतात याची दक्षता घेणे गरजेचे होते. मात्र, प्रारूप मतदार याद्यांची प्रत छपाई होऊन हाती आल्यानंतर प्राथमिक छाननीत मोठी गडबड झाल्याचे उघड झाले.

मतदार यादीसाठी मोजावे लागणार हजारो रुपये
प्रारूप यादी पाहण्यासाठी पालिका मुख्यालय राजीव गांधी भवन तसेच सहाही विभागीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यादी विकत हवी असल्यास प्रति पृष्ठ (दोन्ही बाजू) प्रत्येकी तीन रुपये तर प्रति पृष्ठ (एक बाजू) दीड रुपये शुल्क आहे. एका मतदार यादीतील पानांची संख्या तीन ते चार हजारांच्या घरात असल्याने प्रभागाची संपूर्ण मतदार यादी हवी असल्यास साडेचार ते सहा हजार रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. त्याला पर्याय या यादीची सॉफ्ट कॉपी असून त्यासाठी १०० रुपये आकारले जातील.

शहरात १.२७ लाख मतदार वाढले
प्रारूप मतदार याद्यांनुसार शहरातील मतदारसंख्या १२ लाख १ हजार ३७७ वर पोहोचली असून जवळपास एक लाख २७ हजार नवमतदार वाढले आहेत. सन २०१७मध्ये झालेल्या महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत १० लाख ७३ हजार ४०८ मतदार होते. दरम्यान, पुरुष मतदार ६ लाख ३० हजार २८१, स्त्री मतदार पाच लाख ७१ हजार ४२ तर इतर मतदार ५४ आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत पुरुष मतदार संख्येत ५९ हजार ५८२ तर स्त्री मतदारांच्या संख्येत ६८ हजार ४०५ ने वाढ झाली आहे. इतर मतदार मात्र १८ ने घटले आहेत.

प्रभाग १८ व ३६ मध्ये गोंधळ; सहा प्रभागांना फटका... शालिमार, गंजमाळ, रविवार पेठ परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १८ व सिडको आणि अंबडगाव परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ३६ मधील मतदारांचा काही भाग लगतच्या सहा प्रभागांना जोडला गेला आहे. प्रारूप मतदार याद्या तयार करताना चार कर्मचाऱ्यांकडून या दोन्ही प्रभागांच्या मतदार यादीचा भाग क्रमांक संगणकावर चुकीने नोंदविला गेल्याने तो लगतच्या अन्य प्रभागांना जोडला गेल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे सहा प्रभागांना वगळून उर्वरित ३८ प्रभागांच्या याद्या निर्धारित वेळेत महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. गोंधळ झालेल्या मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून सायंकाळी उशिरा दुरुस्तीसह या सहाही प्रभागांच्या मतदार याद्याही प्रसिद्ध केल्या गेल्या. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी आयोगाने १ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...