आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेने सिन्नर, दिंडोरी, नाशिक यांसह इतर तालुक्यांमध्ये सुरु केलेल्या अनेक शाळांच्या जागांना अद्यापही बिगरशेतीच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. महत्वाचे म्हणजे, अनेक वर्ष उलटूनही या शाळांच्या जागा एनए न झाल्याने या इमारती बेकायदेशीर ठरण्याची भिती संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.
संस्थेच्या संचालक मंडळाने या जागांची बिगरशेती व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही सभासदांनी केल्या. तर संस्थेच्या विकासात योगदान देणाऱ्या माजी मंत्री कै. तुकाराम दिघोळे, एन. एम. आव्हाड यांच्यासह इतरही व्यक्तींचे संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांना नाव न दिल्याने सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ ठराव करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, सभासदांच्या मागणीची दखल घेऊन सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. 18) रोजी संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष अॅड.पी. आर. गिते, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे यांसह विश्वस्त, संचालक व सभासद उपस्थित होते. मखमलाबाद येथे व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेने फार्मसी काॅलेजसाठी इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे. मात्र, तीन ते चार वर्ष उलटूनही हे काम अर्धवट असल्याकडे सभासद गोकुळ काकड यांनी लक्ष वेधले. तसेच संस्थेच्या सिन्नर, दिंडोरी व मखमलाबाद येथील अनेक शाळा व महाविद्यालयांसाठी बांधकामे झाली आहे.
काही ठिकाणी बांधकाम सुरु आहे. मात्र, या जागांना ‘एनए’ परवानगी नसताना संस्थेने बांधकाम कसे केले, असा प्रश्न मनोज बुरकुल यांनी उपस्थित केला. त्यामुळे या इमारती बेकायदेशीर ठरतील, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
योगदान देणाऱ्यांचे नावे देऊन सन्मान व्हावा
व्ही. एन. नाईक संस्थेसाठी मोठे योगदान देणारे कै. दिघोळे व कै. आव्हाड यांच्यासह इतर व्यक्तींचे नावे संस्थेच्या इमारती, प्रयोगशाळा, हाॅल यांना देण्याची भूमिका सभासदांनी मांडली. महत्वाचे म्हणजे, संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब वाघ यांनीही मागणी करूनही नाव दिले जात नसल्याने संचालक मंडळाच्या विरोधात भूमिका घेतली. ते म्हणाले, संस्थेसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे देण्याबाबत कुणाच्याही मनात शंका नसताना वेळकाढू धोरण का अवलंबले जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच तत्काळ या विषयाची घोषणा करावी, असा आग्रह धरला. मनोज बुरकुले, जे. डी. केदार, दिलीप धात्रक, शरद बोडके यांच्यासह सभासदांनी एकमुखी मागणी लावून धरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.