आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांचा मेंढरबाजार:आणखी एका मेंढपाळाला अटक; एजंट कांतीलाल फरार, बेपत्ता मुलांचा अद्यापही शोध सुरूच

नाशिक, अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब कातकरी कुटुंबातील चिमुकल्यांना मेंढ्या वळण्यासाठी वेठबिगारीने लावणाऱ्या पाच जणांविरोधात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी प्रकाश पुणेकर या दुसऱ्या संशयित आरोपीस अहमदनगर पोलिसांनी अटक केली असली तरी या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कांतिलाल कारंडे हा मात्र फरार आहे. त्यामुळे आठ ते नऊ बेपत्ता मुलांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. फरार आरोपींच्या व बेपत्ता मुलांच्या शोधासाठी नाशिक आणि अहमदनगर पोलिसांनी संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे.

इगतपुरी तालुक्यातील उभाडे वस्तीवरील गौरी आगिवले (१०) या मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर बालमजुरांच्या वेठबिगारीचे भयंकर रॅकेट उघडकीस आले आहे. बालकांना विक्री केल्याचे समारे आले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ५ मेंढपाळांविरोधात गुन्हा दाखल झाला. गौरीचा भाऊ साईनाथ याच्या फिर्यादीनुसार प्रकाश पुणेकर या दुसऱ्या मेंढपाळास गुरुवारी अटक करण्यात आली. यातील मुलांच्या पालकांची फिर्याद व पीडित मुला-मुलींनी संगमनेर तालुका दंडाधिकारी यांच्यासमोर दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक गुन्हा पारनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

बेपत्ता बालकांचा शोध सुरू

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी तातडीची बैठक घेतली. यावेळी सहायक कामगार आयुक्त नितीन कावळे, बालविकास अधिकारी वारुडकर पाटील, यांच्यासह बालकांवरील अत्याचार विरोधात काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इतर भागांत चहाच्या टपऱ्या, भंगार दुकाने, रात्रीच्या वेळी चालणारे ढाबे आदी ठिकाणी बालकामगार आहेत का, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.

कडक कारवाई व्हावी : वाघ

बालमजुरांच्या वेठबिगारीचा हा अमानुष प्रकार “दिव्य मराठी’ने प्रकाशात आणल्यावर भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तातडीने उघाडे वस्तीला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी प्रत्यक्ष व अहमदनगर पोलिस अधीक्षकांशी फोनवरून संवाद साधून या गुन्ह्यातील तपासाची माहिती घेतली. वेठबिगारी समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल असेही वाघ या वेळी म्हणाल्या.

व्हिडिओ कॉलद्वारे आरोपीची ओळख

मेंढपाळ मालकांच्या अमानुष मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या गौरीचा भाऊ गुरुनाथ (नाव बदलले आहे) याच्या फिर्यादीनुसार प्रकाश पुणेकर या दुसऱ्या संशयित आरोपीस याप्रकरणी अटक केली. गुरुनाथला ३ वर्षांपासून प्रकाशने वेठबिगार म्हणून ठेवले होते. लाथाबुक्क्यांनी पहाटे उठवून मालक त्याच्याकडून मेंढ्यांचे दूध काढणे, रानात चारणे, विहिरीतून पाणी काढने ही कामे करवून घेत असल्याची तक्रार त्याने दिली. पारनेर पोलिसांनी प्रकाश पुणेकरला व्हिडिओ कॉलवर गुरुनाथला दाखवून त्याची ओळख पटल्यावरअटक केली.

पारनेरच्या चौघांचा शोध सुरू

यातील मुख्य एजंट कांतालाल कारंडे (रा. वनकुटे - पळशी, ता. पारनेर) याच्यासह रामदास लव्हाटे (रा. पळशी, ता. पारनेर), रावा खताळ (रा. ढवळपुरी, ता. पारनेर), रामा पोकळे (रा. पळशी, ता. पारनेर) व कांतीलाल कारंडे (रा. वनकुटे - पळशी, ता. पारनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेरमधील चौघेही फरार असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पारनेर पोलिसांकडे वर्ग केला.

ऊसतोड कामगार ठेकेदारांची चौकशी

जिल्ह्यात मेंढपाळ, ऊसतोड कामगार आणि वीटभट्टी कामगारांकडे वेठबिगारी म्हणून लहान मुलांना ठेवले जाते अशा तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचा गांभीर्याने तपास करण्यासाठी पोलिसांकडून तत्काळ तपास सुरू करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...