आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकच्या ७ वर्षीय अंशुल काळेने दक्षिण आफ्रिका खंडातील टांझानियात असलेले सर्वोच्च १९ हजार ३४१ फूट उंचीचे किलिमंजारो शिखर अवघ्या १२८ तास १५ मिनिटांत सर करून पराक्रम गाजवला.
कृत्रिम ऑक्सिजनशिवाय हे शिखर सर करणारा तो पहिलाच कमी वयाचा गिर्यारोहक असल्याचा दावा काेच आनंद बनसाेडे यांनी केला. वडील वैजनाथ यांच्यासाेबत १३ ते १८ मार्चदरम्यान ही माेहीम फत्ते केली.
अमेरिकेच्या ६ वर्षे ३ महिन्यांच्या एका मुलाने ऑक्जिसनसह हे शिखर सर केल्याची यापूर्वीची नाेंद आहे.
ऑक्सिजनशिवाय सर करणारा जगातील पहिला मुलगा
नाशिकच्या ७ वर्षे ११ महिन्यांच्या युवा गिर्यारोहक अंशुल काळेने आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील १९ हजार ३४१ फूट उंचीचे सर्वोच्च शिखर किलिमंजारो सर करत जागतिक विक्रम केला आहे. हे शिखर कृत्रिम ऑक्सिजनशिवाय सर करणारा जगातील पहिला मुलगा ठरला आहे. अमेरिकेतील एका मुलाने हे शिखर सर केले हाेते. पण त्याने ऑक्सिजनचा वापर केला हाेता.
टांझानिया (आफ्रिका खंड) येथील किलिमंजारो शिखर सर करण्यासाठी नाशिकचे क्रीडा प्रशिक्षक वैजनाथ काळे व त्यांचा आठ वर्षीय मुलगा अंशुल काळे यांनी १८ मार्चला सकाळी सव्वाआठला हे शिखर सर करत तिरंगा फडकविला.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोरर व अबेकोम्बे टूर्स (टांझानिया) यांच्या संयुक्त विद्यमाने आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राच्या या पिता पुत्राने सहभाग घेत इतिहास घडविला. आफ्रिका खंडातील टांझानिया देशात शिखर असून याची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे. अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, घोंगावणारे वारे, पाऊस, उभी चढण, कायमच पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक त्यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. यादरम्यान त्याला अनेक खडतर आव्हानाचा सामना करावा लागला. मात्र, त्याने यशस्वीपणे संकटावर मात करत हे यश संपादन करत विक्रमाला गवसणी घातली. त्याने वयाच्या चाैथ्या वर्षी शिखर सर करण्याच्या माेहिमेला सुरुवात केली.
शिखर चढाईसाठी १३ मार्चला सुरुवात केली होती. गेली अनेक वर्षे अॅथलेटिक्स प्रशिक्षण व फिटनेस प्रशिक्षण देणारे व्ही. डी. के. स्पोर्ट््स फाउंडेशनचे संस्थापक संचालक वैजनाथ काळे यांनी अनेकांना व्यायामाची आवड लावली आहे. अनेक खेळाडू दत्तक घेत त्यांनी राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडवले आहेत. आगामी काळात जगातील सात सर्वोच्च शिखर सर करण्याचे अंशुलचे स्वप्न आहे.
प्रतिकूल वातावरणात चढाई : बनसाेडे
अंशुल व वैजनाथ काळे यांनी जे यश मिळविले त्याचा अभिमान आहे. ३६० एक्सप्लोररच्या माध्यमातून ७ वर्षे ११ महिन्यांच्या अंशुलने भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. प्रतिकूल वातावरणात जी चढाई केली त्याला कशाचीच तोड नाही, अशी प्रतिक्रीया सीईआे, आनंद बनसोडे यांनी दिली. अंशुलची कामगिरी प्रेरणादायी आहेे, असेही ते म्हणाले.
इतरांमुळे साहस पार पाडणे सोपे : अंशुल
या माेहिमेदरम्यान मला सुरुवातीला आव्हानात्मक वातावरणामुळे भीती वाटली होती. आंतरराष्ट्रीय कोच माझे वडील माझ्यासोबत खंबीरपणे होते. याचा मला मानसिक आधार होता. सोबत टीम, आई ज्योती काळे व परिवारातील इतरांच्या सहकार्यामुळे हे साहस पार पाडणे सोपे गेले. आता आगामी काळात मी ऑस्ट्रेलिया खंडातील काेझिस्वाकी शिखर सर करणार आहे. त्यासाठीची माेहिम आता मी आखली आहे. अंशुल काळे, युवा गिर्यारोहक
अंशुलला शिदोरी द्यायची होती - -वैजनाथ काळे, अॅथलेटिक्स प्रशिक्षक
मुलासोबत किलिमंजारो मोहिमेत तिरंगा फडकवण्यासाठी मी आतुर होतो. अंशुलने कृत्रिम ऑक्सिजन शिवाय ही मोहीम केली हे माझ्यासाठी मोठी बाब होती. सर्वांना आश्चर्यचकीत करत अंशुल माझ्याही पुढे शिखरावर पोहाेचला. शिखरावर मी खूपच भावुक झालो होतो. अवघड परिस्थिती व वातावरणात ही मोहीम पूर्ण केली. विश्वविक्रम निर्माण करणे हे ध्येय नव्हते. तो ज्या मानसिक व शारीरिक कसरतीमधून कणखर बनून प्रवास करणार होता, तिच त्याच्या आयुष्याची खरी शिदोरी मला त्याला द्यायची होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.