आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनाची तयारी:भाविकांच्या सुरक्षेसाठी विसर्जनस्थळी जीवरक्षकांची नियुक्ती, पावसामुळे नदी-नाले तुडुंब

प्रतिनिधी । नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दाेन महिन्यांपासून पावसामुळे धरणे तुडूंब भरली आहेत. गोदावरी, वालदेवी, नंदिनी आणि दारणा नदीपात्राची जलपातळी वाढली आहे. ही बाब लक्षात घेत नदीपात्रात विसर्जनावेळी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेतर्फे १६ जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान विसर्जन करताना भाविक बुडण्याचे अनुचित प्रकार घडत असतात. त्यामुळे उत्साहावर दुःखाचे विरजन पडते. ही बाब लक्षात घेत पालिकेने जीव रक्षकांची नियुक्ती केली आहे.

कृत्रिम तलावांची निर्मिती

विसर्जनासाठी २९ पारंपरिक विसर्जन स्थळांबरोबरच ४२ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीघाटावर धोकादायक ठिकाणी बॅरेकेड्स लावण्यात आले आहे. याठिकाणी जीवरक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अनुपस्थित राहिल्यास संबंधितांवर कारवाई हाेणार आहे. तसेच, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक देखील विसर्जन स्थळी उपस्थित राहणार असून तेदेखील अनुचित प्रकार रोखणार आहेत.

पालिका आयुक्तांची पाहणी

मिरवणुक मार्गावरील खड्डे तसेच गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी, ओव्हरहेड विद्युत तारा तसेच अन्य अडचणींची माहिती घेण्यासाठी पालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वत: अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानुसार गुरूवारी रात्री उशिरापर्यंत खड्डे बुझवण्यापासून अन्य कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू हाेती.

जीवरक्षकांची नियुक्ती

अरुण पवार-सोमेश्वर धबधब्यासमोर, शंकर पाटील-सोमेश्वर महादेव मंदिर परिसर, क्रांती न्याहारकर- आनंदवली पूल परिसर, संजय पाटील-रोकडोबा तालीम परिसर, अनिल निगळ- केटीएचएम कॉलेजलगतचा नदीपरिसर, शांत्वन शिंदे- रोकडोबा तालिम परिसर, सुनिल दिघे- हनुमानघाट, घारपुरे घाट, दशरथ दिघे- गांधी तलाव परिसर, कुंदन दळे- यशवंत महाराज पटांगण, नितीन निकुंभ- हनुमान घाट, घारपुरे घाट, रविंद्र ठाकरे-वालदेवी नदी वडनेर परिसर, अशोक भडांगे- दारणा नदीवरील चेहडी पंपींग परिसर, वाळू नवले- वालदेवी नदीवरील पाथर्डी दाढेगाव परिसर, गिरीष चव्हाण- पाथर्डी दाढेगाव परिसर.

बातम्या आणखी आहेत...