आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिमखाना आयोजित जलद बुद्धिबळ स्पर्धेत 12 वर्षांखालील वयोगटात अर्णव पवार तर 18 वर्षांखालील वयोगटात आतिश आहिरे यांनी विजेतेपदे पटकावली. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने नाशिक जिमखाना येथे आयोजित या एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेला नाशिक शहरामधील तसेच त्र्यंबकेश्वर, निफाड आदी तालुकास्तरातून बुद्धिबळ प्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
दोन्ही गटात अचूक निकाला पर्यंत पोहचण्यासाठी पाच फेऱ्या खेळवल्या गेल्या, 12 वर्षांखालील गटात सरस टायब्रेकर आधारे साडेचार गुणांसह अर्णव पवार हा विजेता ठरला असून समान गूण संख्या पण कमकुवत टायब्रेकरमुळे अक्षद मोरे या खेळाडूस द्वितीय तर ऋतुराज पांचाळ यास तृतीय स्थानांवर समाधान मानावे लागले. चतुर्थ व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे आयुष ठोंबरे आणि शर्वरी सांगळे यांनी बाजी मारली.
अठरा वर्षांखालील वयोगटात आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंच्या सहभागामुळे अपेक्षेप्रमाणे कडवी लढत पाहायला मिळाली. अंतिम निकालानुसार पहिल्या पाच खेळाडूंमध्ये चार आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी स्थान पटकावले. आतिश आहिरेने अनेक प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचे धक्के देत स्पर्धेत वर्चस्व गाजवले, तनिष्का राठी, अभिषेक कापसे यांच्यावर मात करत तर सार्थक भापकर याच्याशी बरोबरी साधत एक हजार रुपये रोख व अजिंक्यपदाच्या चषकावर आपले नाव कोरले. सार्थक भापकर या गूणी खेळाडूस द्वितीय स्थानावर तर सृष्टी रांका , तनिष्का राठी या राष्ट्रीय खेळाडूंना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थानांवर समाधान मानावे लागले. ओम शेळके या नवोदित खेळाडू ने चमकदार खेळ करीत पाचवे स्थान पटकावले.
नाशिक जिमखाना संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते प्रथम पाच विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके तसेच विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना रोख परितोषिका बरोबर चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी नरेंद्र छाजेड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना केलेल्या अध्यक्षीय भाषणात आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ हे स्पर्धांमधून शिकावयास मिळते याकडे सर्वांचे लक्ष वेधले, खेळाडूंनी लहान वयातच योग्य दिशेने सातत्याने सराव केल्यास कामगिरीचा स्तर नक्कीच उंचावता येतो आणि यामध्ये पालकांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण असते असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. उदघाटन व पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद रानडे, कोषाध्यक्ष नितिन चौधरी, सहसचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, चेस सेक्रेटरी अभिषेक छाजेड, संजय मराठे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक शेखर भंडारी यांनी केले. प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय ऑर्बिटर व फिडे इंस्ट्रक्टर मंगेश गंभीरे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.