आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकृपा:जायकवाडी धरण 66 % भरल्यामुळे नाशिकहून यंदा कमी विसर्गाची शक्यता; इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाणी

किशोर वाघ | नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेनंतर गंगापूर, दारणासह नांदूर-मधमेश्वर धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. - Divya Marathi
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेनंतर गंगापूर, दारणासह नांदूर-मधमेश्वर धरण दुथडी भरून वाहू लागले आहे.

पैठण येथील १०३ टीएमसी क्षमतेचे जायकवाडी धरण (नाथसागर) यंदा कमी पावसातही ६६.८२ टक्के भरले आहे. धरणात आजमितीस ५१.२३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्ल्यूआरआरए) आदेशाने मेंढेगिरी समितीच्या अहवालातील तक्ता नं. ६ मधील स्टॅटेर्जी-३ नुसार आता नाशिक-नगर अर्थात उत्तर महाराष्ट्रातील कुठल्याही धरणांतून मराठवाड्यास पाणी सोडण्याची अजिबात आवश्यकता नाही. पुढील संपूर्ण वर्षभर नाशिक आणि नगरकरांना पिण्यासह, शेती आणि सिंचनालाही मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदा पावसाने जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यावर पाठ फिरविली होती. त्यामुळे नाशिककरांवरच पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. दुसऱ्या बाजूने जायकवाडीतही ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी असल्याने पुन्हा नाशिककरांना मराठवाड्यासाठी ऐन टंचाईत, कोरोना संकटात पाणी सोडावे लागते की काय अशी चिंता होती. परंतु, गत आठवड्यापासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू झाल्याने गंगापूर आणि दारणासमूहात मुबलक पाणी उपलब्ध झाले. गंगापूर धरण ८४ टक्के तर दारणाने नव्वदी पार केली. पुढील पावसाचे शिल्लक दिवस पाहता ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी ठेवणे अशक्य असल्याने दारणासह नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून मागील ८ ते १० दिवसांपासून सातत्याने १० ते १५ हजारापेक्षा जास्त क्यूसेकने विसर्गही सुरू आहे. दुसरीकडे पालखेडमधूनही पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नाशिकमधून आतापर्यंत जायकवाडीच्या दिशेने १० टीएमसीपेक्षा जास्त पाणी वाहून गेले. निळवंडेतूनही ६ हजार ५३८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जायकवाडीच्या पाणलोटमध्येही चांगला पाऊस झाला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणूनच आजच्या स्थितीत जायकवाडी धरणात ६६.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी नाशिक-नगर-मराठवाडा हा पाणी वाद पुन्हा निर्माण होणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. २५ ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने सर्व धरणे ८० टक्के भरण्याचीही शक्यता आहे.

जायकवाडीसाठी या धरणांतून पाणी

दारणा धरण समूह, गंगापूर धरण समूह, पालखेड समूहातील पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीमार्गे जाते. हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून जाते. कादवा, दारणा या दोन्ही नद्यांचे पाणी गोदावरीला मिळून पुढे ते जायकवाडीकडे जाते. अहमदनगरमधील भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे, ओझर बंधाऱ्यातून प्रवरा नदीतून जायकवाडी धरणात पाेहाेचते. अहमदनगरमधील मुळा नदी ही थेट जायकवाडी धरणात जाऊन मिळते.

कशामुळे यंदा सोडावे लागणार नाही पाणी?

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने शासनाने मेंढेगिरी समितीतील अभ्यास गटाने १९ सप्टेंबर २०१४ रोजी अहवाल सादर केला. त्यानुसार १५ ऑक्टोबरनुसार धरणात किती पाणी उपलब्ध असावे, अशी साठ्यांची निश्चिती केली. त्याचे ‘समन्यायी पाणी वाटप कायदा’ असे गोंडस नामकरण केले. या कायद्यानुसार जायकवाडीच्या बाबतीत तक्ता नं. ६ व त्यातील स्ट्रॅटर्जी-३ नुसार जायकवाडीत १५ ऑक्टोबरला खरिपातील वापरासह ६५ टक्के पाणी उपलब्ध असल्यास ऊर्ध्व गोदावरीतील धरणातून पाणी सोडण्याची गरज नाही. त्यानुसारच गंगापूरमध्ये ८२ टक्के, दारणात १०२ तर पालखेडमध्ये ८२ टक्के पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यंदाचा जायकवाडीतील साठा ६५ टक्क्यांपुढे गेला आहे. त्यामुळे नगरसह नाशिकमधील धरणांतून पाणी सोडावे लागणार नाही.

जायकवाडीत १० टीएमसी अधिक पाणी

जायकवाडी या जलसागराची साठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. नाशिक जिल्ह्यातील २४ प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता ही ६५.८१ टीएमसी म्हणजे जायकवाडीच्या तुलनेत ३६ टीएमसी कमी आहे. सद्यस्थितीत जायकवाडीत ६६.८२ टक्के म्हणजे ५१.२३ टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. या साठ्याशी नाशिकच्या सर्व धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याची तुलना केली तर २४ प्रकल्पांत मिळून ४२.१८ टीएमसी म्हणजे १० टीएमसी पाणी आजही नाशिकमध्ये जायकवाडीच्या तुलनेत कमीच आहे.

जायकवाडीस पाणी सोडावे लागणार नाही

जायकवाडीतील पाणीसाठा आता ६६.८२ टक्के म्हणजे ६५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आता नाशिक, नगर या दोन्ही जिल्ह्यांतील धरणांतून १५ ऑक्टोबरला उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांतून जायकवाडीला पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. तसे एमडब्ल्यूआरआरएने मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार स्पष्टही केले आहे. - अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता, नाशिक

बातम्या आणखी आहेत...