आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:सोनिया गांधी सक्रिय होताच महाराष्ट्रात काँग्रेस आक्रमक, राहुल गांधीची टिंगल करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारमधील निद्रिस्त सहकारी अशी हेटाळणी होणारा काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या सक्रियतेनंतर आक्रमक झालेला दिसतो. पक्षाध्यक्षांची बदनामी करणाऱ्या जाहिरातीमुळे स्टोरिया कंपनीच्या कार्यालयातील आक्रमक आंदोलन, अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना व्यवस्थापन यंत्रणेतील त्रुटींबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यान्वित केलेली जिल्हास्तरीय कोविड सहायता केंद्रे यातून काँग्रेस राज्यातील आपले अस्तित्व अधोरेखित करू लागली आहे.

पक्षाध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या विडंबनात्मक जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंधेरीतील कंपनीच्या कार्यालयात तोडफोड आंदोलन केले. ही जाहिरात त्वरित मागे घ्यावी, पक्षाची माफी मागावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला. त्याच वेळी आघाडी सरकारमधील मवाळ भूमिकेमुळे प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेले काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अहमदनगर जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणेतील त्रुटी, कोरोना रुग्णांचे हाल, औषधांची टंचाई याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी कंपन्यांमधून थेट आणलेल्या रेमडेसिविरविरोधात न्यायालयात धाव घेेणारेही काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. त्याचसोबत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोविड कंट्रोल रूम आणि हेल्प लाइनच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णांना साहाय्यासाठी राज्यव्यापी यंत्रणा राबवली आहे. त्याच्या जोडीला आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कोविड सहायता केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा कोविड सहायता केंद्रांची यंत्रणा उभारून सरकारी यंत्रणेला संघटनेची समांतर व्यवस्था उभी केली आहे.

एकूणच, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांचा बोलबाला असताना, काँग्रेसने आक्रमक आंदोलने आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील आपले अस्तित्व प्रखर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लसींची उपलब्धता आणि किमती याबाबत केंद्र सरकार अन्य पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांशी दुजाभाव करीत असल्याच्या पक्षाध्यक्ष गांधींच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये आक्रमकता आली आहे.

माेफत लसींच्या परस्पर घोषणेमुळे नाराजी
“मोफत’ लसींची घोषणा करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याने पक्षात नाराजी आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. यापुढे राज्यातील जनतेसमोर आणि सोबतच आघाडीतील मित्रपक्षांना आपले अस्तित्व दाखवून देेण्यासाठी काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...