आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:पाकिस्तानी तरुणींचा ‘हनी’ट्रॅप; एचएएल कर्मचाऱ्याची ‘आयएसआय’साठी हेरगिरी, आणखी कर्मचारीही संशयाच्या भाेवऱ्यात

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमान कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल या भारतीय लढाऊ विमान बनवणाऱ्या कारखान्याच्या आेझर येथील युनिटमधून स्वदेशी बनावटीच्या विमाननिर्मितीची अति गोपनीय माहिती परदेशी व्यक्तीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला पुरवत हेरगिरी केल्याप्रकरणी एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. दहशतवादविराेधी पथकाच्या मुंबई व नाशिक पथकाने ही संयुक्त कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव दीपक शिरसाट असे आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी तरुणींमार्फत त्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून हे कृत्य करण्यास भाग पाडल्याचे प्रथमदर्शनी समाेर येत आहे. त्यास न्यायालयाने दहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच देवळाली लष्करी हद्दीत बांधकाम साइटवर काम करणाऱ्या एका मजुराला पाकिस्तानात व्हाॅट्सअॅपद्वारे प्रतिबंधित क्षेत्रातील फाेटाे पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच ही धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

संशयित दीपक शिरसाट याच्याविराेधात शासकीय गोपनीय कायदा १९२३ अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३ मोबाईल ५ सीमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकारानंतर एचएएलमधील आणखी काही कर्मचारीही संशयाच्या भाेवऱ्यात असून त्यांचीही चाैकशी हाेण्याची शक्यता आहे. तसेच एचएएल कर्मचाऱ्यांना कारखान्यात माेबाईल नेण्यावर बंदीही घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक देवेन भारती, उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे, अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सहायक आयुक्त सुनील यादव, निरीक्षक महादेव वाघमोडे, संदीप घुगे, संपत जाधव, संजय भुसाल, विलास वाघ, सुदाम सांगळे, दीपक राऊत, प्रमोद उबाळे, गोविंद जाधव यांचे पथकाने कारवाई केली.

अशी झाली कारवाई
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील ‘रॉ’ या भारतीय गुप्तहेर संघटनेला एचएएलमधून एक कामगार विमान बनवण्याच्या प्रक्रियेची गोपनीय माहिती फाेटाेसह पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’शी संबंधित असलेल्या परदेशी व्यक्तीला देत असल्याची माहिती मिळाली हाेती. ती त्यांनी महाराष्ट्रातील दहशतवादविराेधी पथकाला पाठवताच नाशिकच्या पथकाने संशयितावर पाळत ठेवत ते काम करत असलेल्या एचएएलमधील एका वर्कशॉपवर लक्ष केंद्रित केले. संशयिताच्या मोबाइलवर तंत्रविश्लेषण शाखेच्या पथकाने माग काढत नियंत्रण ठेवले आणि त्यांचा संशय खात्रीत बदलला. पुरावे सापडताच त्याच्या मुसक्या आवळल्या.

कोण आहे हा शिरसाट ?
एचएएल कारखान्यात सिक्स टॉप या रबर आणि प्लास्टिक युनिटमध्ये दीपक शिरसाट (४१, रा. वृंदावननगर, हाॅटेल जत्रा, आडगाव) हा कायम कर्मचारी असून २००४ पासून सहायक सुपरवायझर पदावर कार्यरत हाेता. ताे मूळचा सिन्नर येथील आहे. गेल्या दहा वर्षांपासून ताे िसक्स टाॅप शून्य सहा या एकाच विभागात कार्यरत असल्याने त्याची अन्य विभागात बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतर अनेक महिने ताे दुसऱ्या विभागात हजर झालाच नाही. यातूनच वरिष्ठ अधिकारी व शिरसाट यांच्यात वाद निर्माण होऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार हाेती. तत्पूर्वीच कामगार आयुक्तांकडे तक्रार करत कंपनीच्या आवारात उपाेषण केल्याने ताे चर्चेत हाेता.

दिल्ली, बंगळुरू, जबलपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर ते नाशिक...
पुणे । भारतात लष्कराशी संबंधित माहिती मिळवण्याकरिता पाक लष्करी अधिकाऱ्यांना, मोक्याच्या पदांवर कार्यरत व्यक्तींना सुंदर तरुणींच्या माेहात अडकावून गाेपनीय माहिती चाेरत आहे. दिल्ली, बंगळुरू, जबलपूर, लखनऊ, विशाखापट्टणम, मुंबई, नागपूर व आता नाशिकमध्ये अनेक जण हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे स्पष्ट झाले. ब्रह्मोस एअराेस्पेसचा वरिष्ठ अभियंता निशांत अग्रवाल यास नागपूरमधून २ वर्षांपूर्वी अटक झाली हाेती.त्याने अतिसंवेदनशील दस्तऐवज सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या तीन परदेशी महिलांच्या खात्यावर पाठवले हाेते. तपासात ही खाती बनावट असल्याचे समाेर आले हाेते.

दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू / देशांंतर्गत गुप्तचर यंत्रणा सुधारण्यावर भर गरजेचा
डी. बी. शेकटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त
)
पाकिस्तानच्या युद्धनीतीत बदल झाला आहे. हेरगिरीतून सुरुवातीला सैन्याच्या सीमेवरील हालचाली, शस्त्रास्त्र सज्जता, अधिकारी नियुक्त्या याबाबत माहिती गाेळा करण्यात येत हाेती. मात्र अलीकडच्या काळात ‘हनी ट्रॅप’चे प्रकार वाढलेले दिसून येतात. सुंदर तरुणीचे साेशल मीडियावर खाते असल्याचे भासवून लष्कराशी संबंधित व्यक्तींची माहिती काढून त्यांच्याशी चॅटिंग हाेते. मैत्रीचे नाटक करून थाेड्याच काळात फाेटाेग्राफ, अश्लील व्हिडिआे याद्वारे संबंधित व्यक्तींना जाळयात अडकवण्यात येते. समाेरील व्यक्तीचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याच्याकडून गाेपनीय माहितीचे दस्तऐवज, फाेटाे मिळवले जातात. याकरिता विविध प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करण्यात येताे आणि त्यासाठी अनेकदा पैशाचा पुरवठाही केला जाताे. भविष्यात हा धाेका आणखी वाढेल. नाशिकमधील घटनेतून भारतीय विमानांची कशा प्रकारे तयारी, काेणती विमाने-तंत्रज्ञान वापर हाेताे, देशांंतर्गत गुप्तचर यंत्रणा सुधरण्यावर भर गरजेचा किती काळ विमाने उडवली जाऊ शकतात अशाप्रकारचे माहितीची जमवाजमव पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ करते आहे, हेच स्पष्ट हाेते. केवळ लष्कराशी संबंधित क्षेत्रात हनी ट्रॅपचा वापर केला जात नसून देशातील प्रशासकीय परिवर्तन, आर्थिक कामे, अंतराळ क्षेत्रातील तयारी याच्याशी संबंधित व्यक्तींनाही जाळयात आेढण्याचा प्रयत्न केला जाताे. देशाच्या सुरक्षा यंत्रणांशी संबंधित विभागात काेण लाेक अशाप्रकारे गुंतलेले आहेत, शत्रूचे पैसे घेऊन कामे करतात, याची तपासणी करण्याकरिता देशांतर्गत गुप्तचर यंत्रणा सुधारण्यावर भर दिला पाहिजे. साेशल मीडिया वापरणे आपण थांबवू शकत नसलाे, तरी त्यावर निगराणी ठेवणे गरजेचे आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser