आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक ऑलिम्पिक डे शहरात सायकल रॅली, विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांसह खेळाडूंनी क्रीडा विकास व क्रीडा क्षेत्राचा प्रसार करण्याचा संकल्प केला. या माध्यमातून खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात मेहनत घेऊन ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेपर्यंत मजल मारण्याचे आवाहन केले. शहरातून निघालेली सायकल रॅली सर्वांचे आकर्षण ठरली. या माध्यमातून पर्यावरण बचावसाठी सायकलिंगचे आवाहन केले गेले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने यंदाही मॅरेथान चौकात वर्ल्ड ऑलिम्पिक डे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी काढलेली रॅली लक्षवेधी ठरली.
उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक नानासाहेब महाले, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एस. के. शिंदे, प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले, डॉ. चंद्रकांत बोरसे, डॉ. आय. बी. चव्हाण, आर. बी. पाटील, डॉ. विलास देशमुख, डॉ. संजय काळोगे, मुंजा नरवाडे, डॉ. मुखेडकर, मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, पुष्पा लांडगे, मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वर्ल्ड ऑलिम्पिक डे कार्यक्रमांमध्ये विविध शाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये अभिनव बालविकास मंदिर, मराठा हायस्कूल, फार्मसी कॉलेज, आयएमआरटी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, वाघ गुरुजी, मेडिकल कॉलेज, महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, आयटीआय, कृषी महाविद्यालय, आर्किटेक्चर कॉलेज, पिंपळगाव कॉलेज, सिन्नर कॉलेज, ललित कला महाविद्यालय इत्यादी शाळा व कॉलेजमधील ११०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मविप्र मॅरेथॉन चौकापासून गंगापूररोडमार्गे व्ही. एन. नाईक चौक ते परत मविप्र मॅरेथॉन चौक असा एक कि.मी. अंतराचा वर्ल्ड ऑलिम्पिक डे रन करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. तुषार पाटील, मंगला गुळे यांनी केले. नियोजन क्रीडा अधिकारी हेमंत पाटील व मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी केले.
सायकल रॅलीस शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
“ऑलम्पिक डे” निमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ८.४५ वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून सायकल रॅलीस प्रारंभ झाला. तेथून सीबीएस, शिवाजी रोड, नाशिक जिमखानामार्गे नेहरू गार्डन, रेडक्रॉस सिग्नल, एमजीरोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, गंगापूररोड, मॅरेथॉन चौकमार्गे जाऊन रावसाहेब थोरात सभागृह येथे रॅलीचा समारोप झाला.
शक्ती विकास अकॅडमीतर्फे फुटबॉलचा सराव
जगभरात २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आधुनिक ऑलिम्पिक खेळांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १२८ व्या ऑलिम्पिक दिनानिमित्त शक्ती विकास अकॅडमी या संस्थेच्या वतीने नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर फुटबॉल तसेच धावणे आदी खेळ घेण्यात आले. यात अनेक युवक-युवतींनी सहभाग घेतला. संस्थेचे प्रशिक्षक मनोहर जगताप यांनी खेळांशी संबंधित माहिती देतानाच सुदृढ आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व विशद केले. यावेळी संस्थेच्या सचिव मनीषा जगताप, सदस्य राकेश खरे, क्रीडाशिक्षक रवींद्र बच्छाव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.