आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यजित तांबेंचे नाना पटोलेंवर गंभीर आरोप:अखेरच्या क्षणी मला चुकीचे एबी फॉर्म दिले, कुटुंबाविरोधात षड्यंत्र रचले; अपक्षच राहणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, आपण यापुढेही अपक्षच राहणार, असेही सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.

ऐन निवडणुकीआधी मला चुकीचे एबी फॉर्म दिले. नाशिक पदवीधर निवडणुकीऐवजी मला औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक पदवीधर मतदरासंघाचे एबी फॉर्म देण्यात आले होते, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एवढा गलथान कारभार कसा काय करु शकते. ऐन निवडणुकीआधी अशी गंभीर चूक करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर दिल्लीतून काय कारवाई केली जाईल?, असा सवाल सत्यजित तांबेंनी केला आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेस उमेदवार सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही? सत्यजित तांबेंनी अपक्ष फॉर्म का भरला? सत्यजित तांबे आता भाजपमध्ये जाणार का?, अशा सर्व प्रश्नांवर सत्यजित तांबे यांनी सविस्तर भूमिका मांडली.

मला एखादी जबाबदारी हवी होती

सत्यजित तांबे म्हणाले, काँग्रेसमध्ये मी गेल्या 22 वर्षांपासून काम करत आहे. 2018 मध्ये मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. 2022 ला माझा अध्यपदाचा कार्यकाळ संपला. 22 वर्षे मी राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी काम केले. त्यानंतर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मला एखादी जबाबदारी द्या, अशी मागणी मी पक्षाकडे केली होती. मला आमदार, खासदारकीची हाव नव्हती. फक्त संघटनेत एखादे पद हवे होते. एखादी जबाबदारी हवी होती. याबाबत मी महाराष्ट्रचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडेही मागणी केली होती.

...अन् मला संताप आला

सत्यजित तांबे यांनी सांगितले, प्रभारी एच. के. पाटील यांनी माझी मागणी फेटाळली. घरात वडील आमदार असताना पुत्राला एखादे पद देता येणार नाही, असे मला कळवण्यात आले. मात्र, मी हट्ट सोडला नाही. त्यानंतर एच. के. पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, असे सुचवले. यावर मला प्रचंड संताप आला. मला वडिलांच्या जागेवर काही नको होते. मला स्वत:चे काही निर्माण करायचे होते.

माझ्या उमेदवारीला दिल्लीतून होकार होता

पुढे सत्यजित तांबे म्हणाले, माझ्या पुढील राजकीय कारकिर्दीविषयी मी घरात चर्चा केली. तेव्हा वडील सुधीर तांबे व बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. तेव्हा मी बाजूला होता आता नाशिक पदवीधरची निवडणूक तु लढव, असे वडिलांनी मला सांगितले. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठी तसेच एच. के. पाटील यांना कळवले. त्यानंतर शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या एक, दोन, दिवस आधी आम्ही पक्षश्रेष्ठींशी, प्रभारींशी चर्चा केली. त्यावर उमेदवारी अर्ज सुधीर तांबेंनी भरायचा की, सत्यजित तांबेंनी हे शेवटच्या क्षणी तुम्ही ठरवा. आम्ही एबी फॉर्म पाठवून देतो, असे दिल्लीतून कळवण्यात आले.

सत्यजित तांबे यांनी सांगितले की, 9 जानेवारीला आम्हाला एबी फॉर्म द्या, असे आम्ही महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना सांगितले. तेव्हा ते फॉर्म तुम्हाला नागपूरहून मिळतील, असे आम्हाला सांगण्यात आले. मी माझा माणूस 9 जानेवारीला सकाळी नागपूरला पाठवला होता. मात्र, दिवसभर त्याला एबी फॉर्म देण्यात आला नाही. माझ्या माणसाला 10 जानेवारीरोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत बसून ठेवले. सायंकाळी 7 वाजता त्याला एबी फॉर्म सीलबंद लिफाफ्यात दिला.

नाशिकऐवजी औरंगाबाद, नागपूरचे अर्ज दिले

पुढे सत्यजित तांबे यांनी सांगितले की, आम्ही 11 जानेवारीला सकाळी फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा हे फॉर्म नाशिक पदवीधरचे नसल्याचे आम्हाला कळले. हे फॉर्म औरंगाबाद आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही त्यावर होती. प्रदेश कार्यालयाकडून एवढी गंभीर चूक कशी काय होऊ शकते? हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. यावर प्रदेश काँग्रेसवर काय कारवाई केली जाईल?

माझ्याविरोधात पक्षातूनच षड्यंत्र

सत्यजित तांबे यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्म पाठवू, असे नंतर आम्हाला प्रदेश काँग्रेसकडून कळवण्यात आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी उमेदवारी अर्ज आला. मात्र, त्यावर सुधीर तांबे यांचे नाव होते. व पर्यायाच्या जागी नील असे लिहिले होते. दिल्लीतून उमेदवार तुम्ही ठरवा, असे ठरलेले असताना सुधीर तांबेंची उमेदवारी अखेरच्या क्षणी कशी काय जाहीर झाली?, असा सवाल करत मला उमेदवारी मिळू नये म्हणून पक्षातूनच हा डाव रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप सत्यजित तांबे यांनी केला.

नाना पटोलेंशी वैर नाही

पुढे सत्यजित तांबे म्हणाले, अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला दिल्लीतून फोन आला. तेव्हा मी माफी मागण्यास तयार आहे, असे कळवले. मात्र, तोपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करण्यास सुरुवात केली. हे धक्कादायक होते. नाना पटोले हे मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. त्यांच्याशी माझ काय वैर असू शकत? माहित नाही.

भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सत्यजित तांबे म्हणाले, आपण काँग्रेस कधीही सोडलेली नाही. मी यापुढे अपक्ष राहूनच काम करणार आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असताना एकाच पक्षातील नेत्याने, अशा प्रकारे फूट पाडणे योग्य नाही.

संबंधीत वृत्त

नाना पटोलेंचा खळबळजनक दावा:अजित पवारांनीच सत्यजित तांबेंच्या घरातील भांडणे चव्हाट्यावर आणली, माझ्याकडेही खूप मसाला

सत्यजित तांबेंनी केलेल्या गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडेही खूप मसाला आहे. वेळ आली की सर्व बाहेर काढणार, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. तसेच, अजित पवारांनीच सत्यजित तांबेंच्या घरातील भांडणे चव्हाट्यावर आणली, असा खळबळजनक आरोपही नाना पटोले यांनी केला. वाचा सविस्तर