आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 10-12 दिवस थंडीची लाट:महाबळेश्वरपेक्षाही औरंगाबाद, नाशकात पारा घसरला; ओझरमध्ये सर्वात कमी 6 अंश सेल्सियसची नोंद

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर भारतातील हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले आहे. महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या (१०.६) तुलनेत औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगावात तर पारा जास्तच खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात आेझर येथे रविवारी सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानतज्ज्ञांच्या मते पुढील १०-१२ दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

राज्यात यंदा पंधरा दिवस थंडीचे अगोदर आगमन झाले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली होती. मात्र जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील किमान तापमान घसरले आहे.

महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी

सातारा जिल्ह्यात थंडी वाढली असून महाबळेश्वर-पाचगणी येथे पारा घसरला आहे. वेण्णालेक परिसरात रविवारी सकाळी तापमान एकदम घटले. सकाळी थंडी, दिवसभर निसर्गाचा आनंद व रात्री उशिरापर्यंत पर्यटकांनी बाजारात खरेदीचा आनंद लुटला. डिसेंबर महिन्यात पाचगणी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, चक्राकार वारे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच त्या परिसरातच समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली किनाऱ्याकडे अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यात पाऊस पडेल.

थंडी चांगलीच वाढणार

रविवार ते मंगळवार, २२ नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रात तीन दिवस कडाक्याची थंडी जाणवेल. त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून तिसऱ्या आवर्तनाला सुरुवात होऊन थंडी आणखी वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे तामिळनाडू, आंध्र, केरळमध्ये पावसाचा अंदाज आहे. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...