आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये 23 ब्लॅक स्पॉटवर स्वयंचलित ‘ई-चलान’:वेगाने वाहन चालवल्यास होणार दंड; सीसीटीव्हीसह गतिरोधकही बसवणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरची चौक येथील बस दुर्घटनेनंतर जागे झालेल्या महापालिकेने शहरातील 28 पैकी 23 ब्लॅक स्पॉटवर भरघाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे उभारून ‘ई-चलान’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर, बाह्यरिंगरोडची निर्मिती करून वाहतूक वळविणे आणि द्वारका ते दत्तमंदिर तसेच मिरर्ची चौक ते नांदूरनाका दरम्यान उड्डाणपुल उभारण्याची शिफारस रेझिलिएन्ट इंडिया कंपनीने वाहतूक सर्वेक्षण अहवालाद्वारे पालिकेला केली आहे.

पंचवटीत औरंगाबाद महामार्गावर हॉटेल मिरची चौकात झालेल्या ट्रॅव्हल्स बसच्या अपघातानंतर दिव्य मराठी ने सर्वप्रथम रस्ते वाहतूक समितीची दोन वर्षात बैठकच झाली नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच अपघाताच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसवले जात नसल्याचा मुद्दा प्रकाशात आणला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने महापालिका व पोलिस यंत्रणेमार्फत ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण क्षेत्रांची यादी मागवली होती. ही यादी घेत रेझिलिएन्ट इंडिया कंपनीने ४५ दिवस सर्वेक्षण केले. त्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव चौबे व रिस्क मॅनेजमेंट एक्सपर्ट प्रियंका लखोटे यांनी मंगळवारी आपला अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला.

बाह्य रिंग रोडसाठी हालचाली गतिमान

नाशिक शहरातून 114 किलोमीटर लांबीचे विविध राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जातात. त्यामुळे अवजड वाहने मुख्य रस्त्यावर येत असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेत महामार्गांवरील वाहतुक शहराबाहेरून जाण्यासाठी बाह्यरिंगरोडची शिफारस करण्यात आली आहे. 23 ब्लॅक स्पॉटवर सिग्नल बसविण्याची सूचना करण्यात आली असून या सिग्नल्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ई-चलान लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तीन ठिकाणी होणार उड्डाणपूल

द्वारका चौक ते दत्तमंदिर तसेच औरंगाबाद रोडवरील मिरर्ची चौक, सिध्दीविनायक चौक व नांदूरनाका या दरम्यान उड्डाणपुल उभारण्याची प्रमुख सूचना करण्यात आली आहे.

पादचारी व दुचाकी स्वरांना अपघाताचा 93 टक्केधोका

गेल्या तीन वर्षात रस्ते अपघातात पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण 93 टक्क्यांपर्यंत वाढल्याचा निष्कर्ष काढला असून 2019-20 मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण 55 टक्के तर पादचारी मृत्यू 27 टक्के, 2020-21मध्ये दुचाकीस्वार 62 टक्के तर पादचारी 26 टक्के तसेच 2021-22 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दुचाकीस्वार 65 टक्के तर पादचारी 28 टक्के असल्याचे समोर आले. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण करण्याची शिफारस केली असून त्यामुळे अपघात 50 टक्क्यांनी कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...