आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर तसेच ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांसह इतर काही तत्सम वस्तूंवर शासनाच्या नियमानुसार बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीचा कायदा पाच वर्षांपासूनचा आहे. शून्य कचरा संकल्पनेच्या दृष्टीने नुकतेच त्यासंदर्भात नवे निर्देश आले आहेत. प्लास्टिक सापडले म्हणून व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची पालिकेची इच्छा नाही, मात्र एक महिना शहरातील सर्व व्यापारी संघटनांपर्यंत पोहोचून प्रबोधन करण्यात येईल. त्यानंतर कठोर कारवाई सुरू होईल असा इशारा पालिकेचे आरोग्य अधिकारी आवेश पलोड यांनी रविवारी (दि. ५) दिला. नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिका अधिकारी व संघटनेच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. यावेळी पलोड मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त अत्राम, संघटनेचे अध्यक्ष सुरेश मंत्री, माजी अध्यक्ष महेंद्र पटेल, शेखर दशपुते आदी होते. प्लास्टिकच्या संदर्भात गांभीर्याने विचार व कृती केली तर प्लास्टिक मुक्ती शक्य असल्याकडे अत्राम यांनी लक्ष वेधले. तर ७५ मिलिमीटर जाडीपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणे बंद करण्याचे आदेश कंपन्यांना द्या आणि व्यावसायिकांना प्लास्टिकला पर्याय काय तो द्या असे संघटनेचे अध्यक्ष सुरेश मंत्री यांनी यावेळी आवाहन केले.
व्यापाऱ्यांकडे सध्या जो प्लास्टिक पिशव्यांचा साठा पडून आहे, तो संपेपर्यंत किमान महिनाभर वेळ द्या अशी मागणी माजी अध्यक्ष महेंद्र पटेल यांनी यावेळी केली तर किराण्याच्या वस्तूंचे दोन किलोच्या पुढील पॅकिंग कसे करणार? याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी करताना कारवाईसाठी अगदी सफाई कर्मचारीही दुकानात येतात, काही वेळा ब्लॅकमेलिंगही केले जाते असा आरोप करत हे थांबले पाहिजे असे नवीन नाशिक सिडको विभागाचे अध्यक्ष नाना जाधव यावेळी म्हणाले. राहुल डागा यांनी कंपन्यांना उत्पादन करण्यास बंदी घालण्याची मागणी केली तर व्यापारी सगळे परवाने घेतो, सगळे शुल्क माेजतो, करही भरतो दुसरीकडे रस्त्यावर बसणारे विक्रेते यापैकी काहीच करत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही, याकडे जेलरोड संघटनेचे अध्यक्ष सुनील महाले यांनी लक्ष वेधले.
यावर आहे बंदी
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर पूर्णपणे बंदी प्लास्टिक आणि थर्माकोलचे चमचे ,प्लेट, ग्लास, स्ट्रॉ, ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या दूध विक्री केंद्रांवरून दिल्या जाणाऱ्या पिशव्यातील दूध बंद असलेल्या आणि बंधन नसलेल्या पिशव्या यावर पूर्णतः बंदी आहे.
यांना मात्र सवलत
कंपन्यांकडून थेट पॅकिंग करून येत असलेल्या उत्पादनांना यातून वगळले. पॅकिंग दूध पिशव्या, कंपनी पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ पाण्याच्या बाटल्या इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेससाठी कंपन्यांकडून पॅकिंगमध्ये पाठविण्यात येणारे थर्माकोल यांना मात्र यात सवलत आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.