आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्थलांतरित बालकांच्या शोधासाठी बालरक्षक’अॅप

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळाबाह्य झालेल्या तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे हंगामी स्वरूपात स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षण विभागाने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेद्वारे स्थलांतरित बालकांचा शोध घेऊन त्यांना जवळच्या महापालिका शाळेत दाखल केले जाणार आहे. विशेष म्हणजे, शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांना बालरक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले असून अशा मुलांची नोंद घेण्यासाठी बालरक्षक अॅपही सुरू करण्यात आले आहे.

सर्वेक्षणात आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची नोंद अॅपमध्ये केली जाणार असल्याने आता एका क्लिकवर शाळाबाह्य मुलांची माहिती मिळू शकेल.कोविडच्या दोन वर्षांच्या कालावधीत शाळा बंद असल्याने शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचू शकल्या नाही. या दोन वर्षांत अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेले.

कोविडनंतर शाळा आता पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी अजूनही अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शिक्षण विभागातर्फे नाशिक महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागामध्येही २० नोव्हेंबरपासून हंगामी स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. सर्व केंद्रप्रमुखांनी ही सर्वेक्षण मोहीम राबवताना शिक्षकांकडून आपल्या केंद्रांतर्गत येणाऱ्या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करावे. या परिसरात एकही स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांची माहिती शिक्षक प्रगणक यांनी प्रपत्र अ लिंक : https://forms.gle/toXds27B22XpBHEE8 व प्रपत्र ब लिंक : https://forms.gle/t6a9dwR5HZgsjLnp9 यामध्ये नोंद करावी. तसेच मुख्याध्यापकांनी बालरक्षक अॅपमध्ये सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांची नोंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.

झोपडपट्टी, बसस्थानके परिसरात सर्वेक्षण
मोलमजुरी करणारी कुटुंबे अनेकदा रोजगाराच्या शोधात हंगामी स्वरूपात स्थलांतरित होत असतात. सर्वाधिक स्थलांतरित विद्यार्थी हे वीटभट्टी, ऊसतोड भागात, मोठी बांधकाम प्रकल्प, दगडखाणी, शेतीच्या कामांसाठी, रस्त्यांची कामे, आैद्योगिक वसाहती, रेल्वेस्थानक व बसस्थानके अशा ठिकाणी आढळून येत असतात. शहर व परिसरातील अशा ठिकाणी स्थलांतरित व शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच झोपडपट्टी परिसर, फुटपाथ या ठिकाणांसह बालगृहांमध्येही शोध घेतला जाणार आहे.

‘त्या’ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार
कोविड काळात व त्यानंतर अनेक मुले शाळाबाह्य झालेली आहेत. या मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच हंगामी स्थलांतरित मुलांच्या शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मुलांना जवळच्या शाळेत दाखल करून घेतले जाईल. त्यांचे आधारकार्ड व इतर आवश्यक माहिती संकलित करून घेतली जात आहे. या मोहिमेद्वारे शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल. - सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण विभाग

बातम्या आणखी आहेत...