आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन:जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर ठिय्या; कायम करण्यासाठी फसवणुकीचा आरोप

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा बँकेच्या नाेकरभरतीचे प्रकरण गाजत असून याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साेमवारी जिल्हा बॅंकेच्या सीबीएस जवळील मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. बँकेच्या मुख्य प्रवेशव्दारावरच हे कर्मचारी बसल्याने बॅंकेत कामकाजासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेत जाता आले नाही तर कर्मचारी कार्यालयात बंद हाेते. या कर्मचाऱ्यांनी बॅंकेच्याच प्रशासकिय विभागातील कर्मचाऱ्याने कायम करण्यासाठी न्यायालयाच्या खर्चासाठी वारंवार राेख रक्कम घेतल्याचा आरोप केला आहे. सायंकाळी, पोलिसांनी या संतप्त कर्मचाऱ्यांची प्रशासक अरूण कदम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून दिल्यानंतर चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, हे आश्वासन घेतल्यानंतर हे कर्मचारी जागेवरून उठले.

जिल्हा बॅंकेने बेकायदेशीरपणे बिंदुनामावली मंजूर नसतांनाही नोकर भरतीची प्रक्रिया राबविली. यात मोठा आर्थिक गैर व्यवहार झाल्याचे आराेपही झाले हाेते. या सगळ्या प्रकरणाची चाैकशी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. तर दुसरीकडे औद्याेगिक न्यायालयाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम करण्याची याचिका निकाली काढली आहे. जिल्हा बॅंकेने उच्च न्यायालयात याप्रकरणात कॅव्हेट दाखल करण्याची मागणी हाेत असल्याने सहकार विभागाने तसे आदेश बँकेला दिले आहेत. असे असतांना ह्या संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा बॅंकेच्या मुख्यालयात सोमवारी अचानक ठिय्या मांडला.

बॅंकेच्या प्रशासन विभागातील कर्मचाऱ्याने तुम्ही कायम झालेच समजा, पेढे तयार ठेवा असे आश्वासन दिले, व न्यायालयीन दाव्याकरीता तसेच फि पाेटी वारंवार काही जणांकडून राेख रक्कम घेतली तर एलआयसी काढायची सांगून कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेतल्याचा आरोप या संतप्त कर्मचाऱ्यांनी केला.अनेकांनी यांनी दिलेल्या शब्दामुळे कर्ज घेऊन पैसे दिले तर या संबंधितांनी मानसिक, छळ, आर्थिक पिळवणूक केल्याची तक्रार केली तर काेराेना काळातही आम्ही बॅंकेचे कामकाज केले, कायम असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बराेबरीने आपण करीत असून मिळणारा माेबदला मात्र अत्यल्प आहे, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठिण झाले असल्याचा संताप या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...