आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांचा मेंढर बाजार:एक मेंढी अन् 5 हजार रुपयांत मुलांचा सौदा, 6 ते 15 वयाेगटातील 30 मुलांची विक्री

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपडीपुढे बेशुद्धावस्थेत टाकलेल्या लेकीला बघून हादरलेल्या तुळसाबाई. - Divya Marathi
झोपडीपुढे बेशुद्धावस्थेत टाकलेल्या लेकीला बघून हादरलेल्या तुळसाबाई.

प्रत्येकी ५ हजार रुपये व एका मेंढीच्या बदल्यात इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरच्या मुलांची खरेदी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गौरी आगिवले या बालिकेच्या संशयास्पद मृत्यूने हे रॅकेट उघडकीस आले.

आतापर्यंत अशा ३० मुलांची विक्री झाल्याचे धक्कादायक वास्तव रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने समोर आणले. यातील ६ मुले सापडली असून २४ मुले बेपत्ता आहेत. याप्रकरणी घोटी (जि. नाशिक), अकोले आणि घुलेवाडी (जि. अहमदनगर) या तीन पोलिस स्टेशनमध्ये वेठबिगारी, बालमजुरी आणि अ‌ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारू पाजून आदिवासींकडून मुले खरेदी करणारा एजंट कांतीलाल करांडे फरार असून मुले खरेदी करणाऱ्यांपैकी एक विकास कुदनर यास अकोले पोलिसांनी अटक केली. यात अहमदनगरचीही ६ मुले खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

३ हजारांत मेंढपाळांना दिलेल्या मुलीचा मारहाणीमुळे मृत्यू

३ वर्षांपूर्वी अवघ्या ३ हजारांत मेंढ्या चारण्यासाठी दिलेल्या पोटच्या चिमुरडीला (१०) मेंढपाळांनी चटके व गळफास देत बेदम मारहाण करत घरासमोर टाकून देत पलायन केले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील कातकरी समाजाची ही मुलगी आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन संशयितांना अटक झाली.तुळसाबाई सुरेश आगिवले यांनी तीन वर्षांपूर्वी मुलगी गौरी (१०) हिला विकास सीताराम कुदनर (शिंदोडी, ता. संगमनेर) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर त्यांनी गौरीला प्रचंड मारहाण केली. २७ ऑगस्टला मध्यरात्री गौरीला उभाडे येथील तिच्या झोपडीजवळ टाकून पलायन केले. सात दिवसांच्या उपचारानंतर गौरीचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर श्रमजीवी संघटनेने वाड्या-वस्त्यांवर केलेल्या पाहणीत अशा ३० मुलांची विक्री झाल्याचे उघडकीस आले.

हे छायाचित्र तुम्हाला विचलित करू शकते

मालक रोजच मार द्यायचा; पाच पीडितांची आपबीती

  • पीडित 1 (वय १० वर्षे) : मालक विकास कुदनर, शिंदोडी, ता. संगमनेर - मला व बहीण गौरीला संगमनेरच्या मालकांंकडे पाठवले. मालक रोज पहाटे पाचला उठवून मेंढ्यांचं दूध काढायला लावायचा. ३ वर्षांत एकदाच आई-वडिलांना भेटायला पाठवलं.
  • पीडित 2 (१३ वर्षे) : मालक रावा खताळ, ता. अकोले, जि. नगर - मी सहावीपर्यंत आश्रमशाळेत शिकले. वडिलांना ५ हजार देऊन मला मेंढ्या वळायला पाठवले.
  • पीडित 3 (१३ वर्षे) : मालक कांतीलाल, ता पारनेर, जि. नगर - ३ वर्षांपूर्वी मला व भावाला मालक मेंढ्या वळण्यासाठी घेऊन गेला. काम नाही केलं तर पायावर आणि पाठीवर मारायचा. एकदा मला कुत्रा चावला तेव्हा उपचार न करता मेंढ्यांमागे पाठवलं.
  • पीडित 4 (१० वर्षे) : मालक प्रकाश पुणेकर, संगमनेर - मालक मेंढ्यांमागे पाठवायचा. शिवीगाळ करायचा. उपाशी ठेवायचा. रात्री उशिरापर्यंत विहिरीतून पाणी आणून मेंढ्यांना पाजायला लावायचा.
  • पीडित 5 (१५ वर्षे) : मालक रामा पोकळे, संगमनेर - पाचवीत जात होतो . शेठ बुक्क्यांनी मारून पहाटे उठवायचा. चहा-खारी खायला द्यायचा. दिवसभर मेंढ्या वळायच्या, बाकी कामं करायची.

गरीबीचा गैरफायदा घेऊन मेंढपाळांनी केली होती गौरीची खरेदी, कसे चालते रॅकेट? वाचा सविस्तर

दिव्य मराठी भूमिका :
या मुलीचे डोळे उघडे आहेत; सरकार, तुम्ही डोळे मिटून घ्या

(प्रणव गोळवेलकर, राज्य संपादक)

अखेर तो विकास सापडला! हाच तो विकास आहे ज्याला लोक शोधत होते. त्या दहा वर्षांच्या मुलीच्या गळ्यावर जे दोरीचे वळ दिसतायत, तोच हा विकास आहे. हो तोच हा विकास आहे. मोठमोठ्या सभांत मोठमोठ्या आवाजात मोठमोठे नेते ज्याच्या नावाने मतं मागतात, तोच हा विकास आहे. सहा वर्षांच्या मुलांना आईबाप पाच-पन्नास हजारांसाठी वर्षभर मजुरीला पाठवून देतात, तोच हा विकास आहे. मेंढरं आणि मुलं ज्याच्या नजरेत सारखीच आहेत, तोच हा विकास आहे. ती २४ मुलं रानात कुठंतरी भटकत आहेत पण सरकारला त्यांच्याकडे पाहायला वेळच नाही. कारण सरकार विकास आणण्यात मश्गूल आहे. सरकार! तुमची सत्ता, तुमची खुर्ची आणि तुमची संपत्ती हे सगळं ती मुलगी पाहत आहे उघड्या निष्प्राण डोळ्यांनी. आता ती डोळे मिटू शकणार नाही. सरकार, आता तुम्हीच डोळे मिटून घ्या.

बातम्या आणखी आहेत...