आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता राज यांचे 'ऑपरेशन नाशिक':गमावलेला गड मिळवण्यासाठी सप्टेंबर अखेरीस ठोकणार तळ; पक्ष संघटन, सभासद नोंदणी होणार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शस्त्रक्रियेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा दोन ते तीन महिन्याच्या अंतराने सक्रिय झाले आहेत. आता त्यांनी आपला जुना बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. गणेश उत्सवानंतर अर्थातच सप्टेंबर अखेरीस राज ठाकरे नाशिकमध्ये येणार आहेत.

सभासद नोंदणीही होणार

मतदार यादी निहाय नियुक्त केलेल्या राजदूतांना घरोघरी जाऊन कशा पद्धतीने मनसेविषयी लोकभावना तयार करणे याचेही धडे दिले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनसेने आगामी पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर सभासद नोंदणीचा संकल्प सोडला असून नासिक शहर व जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा अधिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याचेही बोलले जाते.

पुन्हा झंझावट दिसणार

गेल्या काही महिन्यापासून राज यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्याचे पडसाद नाशिकमध्ये येऊन उमटले होते. भोंगे विरोधी आंदोलनामध्ये नासिक मधील मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. राज यांचा झंझावती दौरा नाशिक मध्ये होण्याची मनसैनिकांना अपेक्षा असतानाच अचानक पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. राज यांच्या पश्चात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिक मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद कायम ठेवला होता.

मेळाव्यानंतर सक्रीय

आता राज यांची प्रकृती चांगली झाली असल्यामुळे तसेच त्यांनी मुंबईमध्ये नुकताच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतल्यामुळे पुन्हा एकदा ते सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ठाकरे यांनी मुंबई, ठाणे पुणे नाशिक व औरंगाबाद या शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे व त्यानंतर ते नाशिकला येणार आहेत.

अमित यांनी केली पायाभरणी

अमित ठाकरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक जिल्हा पिंजून काढला होता. खास करून महाविद्यालयीन तरुण तसेच युवा वर्गाशी थेट प्रश्न उत्तराच्या माध्यमातून खुला संवाद साधत त्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले तसेच त्यांना मनसेमध्ये सक्रिय होण्याचे आवाहनही केले होते. एवढेच नव्हे तर, स्वतःचा मोबाईल क्रमांक देखील उपलब्ध करून देत कधीही व कोणताही प्रश्न मांडायचा असेल तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अमित यांनी पायाभरणी केली असून आता त्यावर राज ठाकरे कशा पद्धतीने कळस चढवत हे बघणे महत्त्वाचे आहे.

शाळा, महाविद्यालयात सभासद नोंदणी

नाशकात मनसेचा चाहता वर्ग मोठा असल्याचे लक्षात घेत प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर तसेच गर्दीच्या ठिकाणी मॉल्स, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, बाजारपेठेमध्ये सभासद नोंदणी केली जाणार आहे. सभासद नोंदणी करताना मनसेची ध्येय धोरणे देखील कार्यकर्त्यांमार्फत पटवून दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...