आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा १६ वर्षांखालील संघाचा कर्णधार डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची १६ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. १७ एप्रिल ते ११ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , कुमार खेळाडूंसाठी हे शिबीर होणार आहे.
मागील हंगामात मे व जून २०२२ मध्ये शहरात झालेल्या आमंत्रितांच्या साखळी ( इन्व्हिटेशन लीग ), स्पर्धेतही साहिल पारखने पाच डावात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर सुपर लीग स्पर्धेतही तीन सामन्यात एकूण १५४ धावा केल्या होत्या. या लक्षणीय कामगिरीच्या जोरावर साहिलची यंदा १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
सुरत येथे खेळल्या गेलेल्या बीसीसीआय विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिक्कीम संघावरील विजयात साहिलने केवळ १४९ चेंडूत ३५ चौकार व ४ षटकारांसह तूफान फटकेबाजी करत धमाकेदार नाबाद २२४ धावा केल्या व नंतर आसाम विरुद्ध हि अर्धशतक केले.वेळोवेळी झालेल्या अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ आता साहिलची एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी निवड झाली निवड झाली आहे.
साहिलच्या या अतिशय महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साहिलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.