आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सौंदर्यीकरण करा, मात्र गोदाकाठचे पावित्र्यही जपा

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मार्ट सिटीच्या बैठकीत संतप्त नागरिकांकडून सूचना, तक्रारींचा पाऊस; लवकरच पाहणी

स्मार्ट सिटीकडून होत असलेल्या कामादरम्यान नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायऱ्या तोडण्यात आलेल्या होत्या. या प्रकारामुळे धार्मिक वास्तूचे नुकसान होण्याबरोबरच गोदाकाठचे पुरातत्वही धोक्यात आले होते. याला विरोध करत स्थानिकांनी हे काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १०) पंचवटीतील विभागीय कार्यालयात झ‌ालेल्या बैठकीत संतप्त नागरिकांनी गोदेसह तीर्थस्थळांचे पावित्र्य आणि पुरातत्त्व जपा अशी तंबीच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे आता यासंदर्भात नागरिकांसह अधिकारी गोदाकाठावर संयुक्त पाहणी करणार आहेत.

स्मार्ट सिटीने कामे करताना गोदाघाटावरचा तसेच शहराचा पुरातत्व ठेवा जपला पाहिजे. या परिसरात सुरू असलेली कामे आधी पूर्ण करावीत त्यानंतरच नवीन कामाला सुरुवात करावी. तसेच कोणतेही कामे करताना आधी त्याबाबत स्थानिक नागरिकांना त्याची माहिती देत चर्चा करावी. धार्मिक वा पुरातन वास्तूचे नुकसान होऊ देऊ नये, असा भडिमारच या बैठकीत नागरिकांनी केल्याने स्मार्ट सिटी व नागरिकांची समन्वय बैठक चांगलीच वादळी ठरली. नाशिक म्युनसिपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने गोदा ब्युटिफिकेशन अंतर्गत गोदाकाठ परिसरात विविध कामे केली जात आहे. याच कामांआतर्गत नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायऱ्या तोडण्यात आलेल्या होत्या. या प्रकारामुळे धार्मिक वास्तूचे नुकसान होण्याबरोबरच गोदाकाठचे पावित्र्य आणि पुरातत्वही धोक्यात आले होते. याला विरोध करत स्थानिकांनी हे काम बंद पाडले होते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १०) पंचवटीत स्मार्ट सिटीच्या समन्वय बैठक झाली.

या बैठकीत प्रोजेक्ट गोदा ब्युटीफिकेशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या गोदापार्क, गोदाघाट, संभाजी उद्यान, दीपस्तंभ आदी कामाबाबत पीपीटीद्वारे उपस्थिताना माहिती देण्यात आली. यावेळी गोदावरीतील काँक्रीट काढण्याबाबतचा मुद्दा देवांग जानी यांनी उपस्थित केला. स्मार्टसिटीने केवळ दोन कुंडांचे काँक्रीट काढले मात्र उर्वरित कुंडांचे काँक्रीट कधी काढणार असा सवाल उपस्थित केला. तसेच सांडव्यावरच्या देवी मंदिर परिसरातील तोडलेला सांडवा कधी बांधणार याबाबत अधिकाऱ्यांना सवाल विचारत कारभारावर प्रश्न उपस्थित केले. गोदाकाठ परिसरात थेट जेसीबी, पोकलॅण्डच्या माध्यमातून खोदकाम केले जात असल्याने या परिसरातील इमारती, धार्मिक वास्तुंना तडे जात असल्याबाबत कल्पना पांडे यांनी लक्ष वेधले. तसेच रामसेतू पूल तोडण्याला विरोध असल्याचे सांगितले. रामकुंडावर स्नानासाठी येणाऱ्या महिलांसाठी वस्त्रांतरगृहाबाबत प्रतीक शुक्ल यांनी लक्ष वेधले. यावेळी स्मार्टसिटीचे सीईओ सुंमत मोरे, स्थापत्य विभागाचे किसन कानड, प्रकाशसिंह चव्हाण, विशाल कोशिरे, संजय काशिकर, संजय खैरे, दिलीप शुक्ल आदी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी मान्य केल्यानंतरच केली कामे
स्मार्ट सिटी अंतर्गत केली जाणारी कामेही पालिका व लाकप्रतिनिधींच्या मान्यतेनंतरच होत असल्याचे यावेळी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वच गोष्टींसाठी स्मार्ट सिटी दोषी नसल्याची भूमिका यांनी अधिकाऱ्यांनी मांडली.

स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन कामे करणार
गोदाकाठ परिसरातील स्मार्ट सिटी अंतर्गत कामे स्थानिक नागरिक, शासकीय इतर विभागांची चर्चा करत पूर्ण केली जाणार आहे. बैठकीत नागरिकांनी दिलेल्या सूचनांना विचार केला जाईल. - सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी

​​​​​​​
नागरिकांच्या सूचना अशा
{ गोदावरीतील नैसर्गिक जलस्त्रोत पुनर्जीवित करा.
{ सांडव्यावरील देवी मंदिर मंदिरातील सांडवा तातडीने बांधण्यात यावा.
{ कुंड क्राँकीटमुक्त करा.
{ रामसेतू तोडण्याऐवजी दुरुस्त करावा.
{ गोदाकाठावर बसविलेल्या फरशांची गुणवत्ता तपासा.
{ रामकुंडावर निवारा शेड उभारा.
{ रामरथ मार्गाचा आढावा घेत ठोस उपाययोजना कराव्या.

बातम्या आणखी आहेत...