आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुने नाशिकमधील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बडी दर्गाह गुरुवारपासून गजबजले आहे. पुढील १२ दिवसांच्या उरुसामुळे येथे माेठी गर्दी येथे हाेणार असल्याने तसे नियाेजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने गेल्या ५० वर्षांची परंपरा असलेली जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेसाठी निघणारी पोलिसांची मानाची चादर ही गुरुवारी दर्गाहवर अर्पण करण्यात आली. जुने नाशिक परिसरातील पिंजारघाट रस्त्यावर असलेला बडी दर्गा जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.
सर्वधर्मीय भाविक मनोभावे यात्रेत सहभागी होऊन वार्षिक यात्रोत्सवात सहभागी होतात. दरवर्षी यात्रोत्सव मे महिन्यात साजरा होत असते. साधारणतः ५० वर्षांपासूनच्या पारंपरिक प्रथेनुसार पोलिस आयुक्तालय व भद्रकाली पोलिस ठाण्याच्या वतीने चादरची मिरवणूक काढण्यात येते. गुरुवारी (दि. ४) संध्याकाळी साडेसात वाजता भद्रकाली पोलिस ठाण्याच्या आवारातून पारंपरिक प्रथेनुसार मिलादने हुसेनी बाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त चादरची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत पोलिस आयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षकांसह शांतता समितीचे सदस्य सहभागी झाले. दरवर्षी यात्रेच्या पहिल्या दिवशी पोलिसांना प्रथम चादर अर्पण करण्याचा मान दिला जातो. मागील ५० वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. जुने नाशिकमधील पिंजारघाट परिसरात बडी दर्गा असून दरवर्षी दर्ग्याच्या आवारात यात्रोत्सव भरविण्याची पारंपरिक प्रथा आहे. यंदाचा उरूस ३९५वा असल्याची माहिती पीरजादा कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
या उरूसमधील ‘फालुदा’ या शीतपेयाचे विशेष आकर्षण असते. जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लिमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो. जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून बडी दर्ग्याचा नावलौकिक आहे. यात्रोत्सवानिमित्त बडी दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
चोख बंदोबस्त
यात्रेसाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा यात्रोत्सव पुढील बारा दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शहीद अब्दुल हमीद चौकातून पुढे पिंजारघाट मार्गावर चारचाकी वाहनांसह रिक्षांना प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची संशयित व्यक्ती अथवा बेवारस वस्तू दर्ग्याच्या परिसरात यात्रेत आढळून आल्यास भाविकांनी शहर पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.