आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:लष्करी विमानांचा 22 हजार कोटींचा प्रकल्प नाशकात आणण्यासाठी भुजबळांचे टाटांना साकडे

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील संरक्षण क्षेत्राचे द्वार खासगी कंपन्यांना उघडल्यानंतर आघाडीचा उद्योग समूह असलेल्या टाटा समूहाला लष्करी विमाने तयार करण्याचे २२ हजार कोटींचे कंत्राट केंद्र सरकारकडून मिळाले आहे. त्यामुळे टाटा समूहाकडून हा प्रकल्प उभारण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये चाचपणी केली जात आहे. नाशिकमध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिक उद्योजकांनंतर आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही रतन टाटा यांना साकडे घातले आहे.

नाशिकमध्ये एचएल ही विमान निर्मितीशी संबंधित कंपनी असल्याने, टाटा समूहाच्या या प्रकल्पाला मोठा लाभ होऊ शकतो. अशात हा प्रकल्प इतरत्र न उभारता नाशिकमध्येच उभारला जावा असेही भुजबळ यांनी टाटा यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि टाटा-एअरबस यांच्यात २२ हजार कोटींचा करार करण्यात आला आहे, या करारानुसार सी-२९५ प्रकारातील ५६ विमानांची निर्मिती केली जाणार आहे. संरक्षण क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले केल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जात आहे. लष्कर आणि हवाईदलासाठी विमाने तयार करण्याचा प्रस्ताव २०१२ मध्ये तयार करण्यात आला होता. यासाठी टाटा समूह आणि एअरबस यांच्याकडून प्राथमिक काम करण्यात आले होते. मात्र, मधल्या काळात हा प्रस्ताव धूळखात पडला.

गेल्या वर्षी पुन्हा या विषयाला हात घालण्यात आला. या प्रस्तावातील अडचणी दूर करण्यात आल्या. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशात लष्कर आणि हवाईदलासाठी सी-२९५ प्रकारातील ४० विमाने तयार केली जाणार आहेत. या कराराने देशात सहा हजार नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशात हवाई उद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानदेखील येणार आहे. करारानुसार चार वर्षांत १६ विमाने सरकारला सुपूर्द केली जाणार आहेत.

विमानाच्या निर्मितीसाठी हैदराबाद आणि बंगळुरूजवळ जागेचा शोध घेतला जात आहे. तसेच गुजरात आणि उत्तर प्रदेशातदेखील प्रकल्पासाठी जागेचा विचार केला जात आहे. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रात त्यातही नाशिकमध्ये यावा यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. नाशिकच्या उद्योजकांनी यापूर्वीच टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना हा प्रकल्प नाशिकमध्ये यावा यासाठी साकडे घातले आहे.

प्रकल्प नाशिकमध्येच यावा यासाठी प्रयत्न
नाशिकमध्ये एचएल कंपनी असल्याने टाटा समूहाच्या विमान निर्मिती प्रकल्पाला मोठा हातभार लागू शकतो. शिवाय नाशिकची कनेक्टिव्हिटी लक्षात घेता हा प्रकल्प नाशिकमध्येच यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रतन टाटा यांच्याकडे साकडे घातले असून सकारात्मक प्रतिसादाची आम्ही अपेक्षा करीत आहाेत. - मनीष रावल, उद्योजक

बातम्या आणखी आहेत...