आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्थानकडून आलेल्या पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतात किमान तापमानात घसरण झाल्याने हिमवृष्टीसह काही ठिकाणी पाऊस होत आहे. त्यामुळे काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड भागात थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी महाराष्ट्रातीलही तापमानात नवीन वर्षात घसरण दिसून येत आहे.
लेह येथे किमान तापमानात घसरण होऊन वजा ६.२ अंश सेल्सियसची नोंद झाली होती. तर श्रीनगर येथे २.८,पहलगाम २.२ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे, तर हिमाचल, उत्तराखंड या ठिकाणी हिमवृष्टी होत असल्याने या भागात थंडीच्या कडाक्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, महाबळेश्वर येथे किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण झाली होती. रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे निचांकी ७.८ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम चक्रावातामुळे उत्तर भारतील श्रीनगर, जम्मू, बनीहाल, कुर्फी, सिमला परिसरात ढगाळ वातावरण असल्याने या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर लेह, कारगील, पहलगाम, बालटाण, गुलमर्ग, सोनमर्ग या ठिकाणी हिमवृष्टी होत असल्याने थंडीचा कडाका आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हे वातावरण आगामी ६ जानेवारीपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने उत्तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात शीतलहर रहाणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला. वर्षाअखेरीला म्हणजे ३१ डिसेंबर रोजी थंडीचे प्रमाण कमी जाणवत होते, मात्र नवीन वर्षाच्या प्रारंभालाच किमान तापमानात घसरण झाल्याने पहाटेपासून थंडीचा कडाका वाढला होता. रविवारी वातावरणात दुपारपर्यंत गारवा असल्याने नागरिकांनी उबदार कपडे परिधान करावे लागत होते.
पिकांसाठी पोषक वातावरण
थंडीचा हंगाम हा गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. परंतु थंडीमुळे द्राक्ष पिकांत साखर उतरण्यासाठी विलंब होत असल्याने संजीवके वापरावी लागत आहेत. तसेच किमान तापमानात घसरण झाल्यास द्राक्ष उत्पादकांना बागेत मोकळे पाणी भरावे लागणार आहे. काही ठिकाणी शेकोट्या पेटवून बागेमध्ये उबदार वातावरण ठेवावे लागते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता आहे.
निफाड येथे नीचांकी ७.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद
राज्यातील किमान तापमान
निफाड ७.८, धुळे ९.६, नाशिक १०.०, औरंगाबाद १०.७, जळगाव ११.०, पुणे १२.५, गडचिरोली १३.४, बारामती १३.८, महाबळेश्वर १३.९, गोंदिया १४.५, सातारा १४.९, माथेरान १५.२, अमरावती १५.५, नागपूर १५.६, अकोला १५.९.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.