आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष विजयी झालेले आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी मौन सोडले. काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म नाकारून आपल्यावर अन्याय केला, त्यामुळे नाइलाजास्तव मला अपक्ष निवडणूक लढवावी लागली, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. निवडणुकीत मला सर्वपक्षीयांनी मदत केल्यामुळे यापुढे मी अपक्ष म्हणूनच काम करेन, असे सांगत तांबे यांनी तूर्त तरी भाजपात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र ‘देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे आहेत’ असे सांगून त्यांनी पुढचे राजकारण भाजपला अनुकूल असल्याचे संकेत दिले. त्यामुळेच काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जाहीरपणे शरसंधान साधत तांबेंनी काँग्रेसमध्ये परतण्याचे दोर स्वत:च कापून टाकले आहेत.
निवडणूक नाशिकची, काँग्रेसने एबी फॉर्म दिले औरंगाबाद, नागपूरचे : सत्यजित तांबे { मी काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच अर्ज भरला होता, पण माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने उमेदवारी अपक्ष झाल्याचे सत्यजित यांनी सांगितले. { माझ्या माणसाला नागपुरात १० तास ताटकळत ठेवून नंतर दोन कोरे एबी फाॅर्म दिले, तेही चुकीचे. नाशिक पदवीधरची निवडणूक व हे फॉर्म औरंगाबाद व नागपूर शिक्षक मतदारसंघाचे होते. (हे फॉर्मही तांबेंनी दाखवले) { उमेदवारीचा निर्णय तांबे कुटुंबीयांनी घ्यावा, असे दिल्लीतून सांगण्यात आले होते, मग एेनवेळी प्रदेश काँग्रसने सुधीर तांबेंच्या नावे एबी फॉर्म का पाठवला? { चूक नसताना मी श्रेष्ठींची माफी मागण्यास तयार होतो, पण तरीही मला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्यासाठी मामा बाळासाहेब थाेरात व तांबे कुटुंबीयांविरुद्ध स्टाेरी रचली. {इतकी वर्षे आम्ही पक्षाचे काम केले तरी एका सेकंदात निलंबित केले. आमचे मतही एेकून घेतले नाही. {जोपर्यंत असे पायात पाय अडकवणे सुरू राहील, ताेपर्यंत राहुल गांधींच्या ‘हाथ से हाथ जोडो’चा काय उपयाेग?
एबी फॉर्म चुकीचे होते तर तांबेंनी ते बदलून का घेतले नाहीत : लोंढे { प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, काँग्रेसने योग्यच कोरे एबी फॉर्म पाठवले होते. ते मिळाले असा ‘ओके’ मेसेज बाळासाहेब थोरातांच्या ओएसडींनी पाठवला होता. (हा पुरावा लोंढेनी पत्रकारांना दाखवला) { निवडणूक कुणी लढायची हा निर्णय तांबेंनी घ्यावा असे पक्षाने सांगितले होते. मग कौटुंबिक पातळीवर निर्णय त्यांनी का घेतला नाही? वेळेवर फॉर्म का भरला नाही? कोरे एबी फॉर्म अर्जासोबत का जोडले नाही? { एबी फॉर्म चुकीचे होते तर तांबे यांनी ते का बदलून घेतले नाहीत. पटोलेंचा फोन लागला नाही हे त्यांचे आरोपही चुकीचे आहेत. आमदार अभिजित वंजारींच्या फोनवरून सुधीर तांबेंशी तर आमदार वजाहत मिर्झा यांच्या फोनवरून सत्यजित यांच्याशी पटोले बोलले होते. { नगरचे राजकारण व विखे यांचा भाजपातील दबदबा पाहता आता भाजप आपल्याला पक्षात घेणार नसल्याचे लक्षात येताच सत्यजित यांनी ही खेळी खेळली का? { प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, तांबेंबाबत निर्णय हायकमांड घेतील. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल मी पद्धतशीरपणे बोलणार आहे. माझ्याकडे खूप मसाला आहे, पण मला तेवढे सांगायचे नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.