आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:भाजप नेत्यांची फौज जिल्ह्यांच्या दौऱ्यावर; आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या विविध जिल्ह्यांत बैठका घेणार

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षणप्रश्नी सर्व नेत्यांनी एकत्र यावे : खा. संभाजीराजे

मराठा आरक्षणावर सक्रिय झालेल्या भाजपने आपल्या काही “मराठा’ नेत्यांना मैदानात उतरवले असून शुक्रवारपासून त्यांचे तीन दिवसांचे दौरे सुरू होत आहेत. प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला असून या दौऱ्यात तेथील भाजपचे कार्यकर्ते आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्ते यांच्या बैठका हे नेते घेतील. मराठा आरक्षणासाठी पक्षविरहित एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन या वेळी केले जाईल.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास संरक्षण मिळवण्यात राज्य सरकारला आलेले अपयश आणि केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून समाजाच्या प्रश्नासाठी सर्व संघटनांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने भाजपने मराठा नेत्यांना जिल्हावार दौऱ्यांसाठी पाठवले आहे.

या नेत्यांमध्ये प्रवीण दरेकर (रायगड), प्रसाद लाड (रत्नागिरी), रवी चव्हाण (सिंधुदुर्ग), आशिष शेलार (नांदेड, बीड), नारायण राणे (पुणे, ठाणे), हर्षवर्धन पाटील (सातारा), संभाजी पाटील निलंगेकर (औरंगाबाद, जालना), नरेंद्र पाटील (बुलडाणा, अकोला), राधाकृष्ण विखे पाटील (नाशिक, नगर) इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. आरक्षणाचे आंदोलन तीव्र झालेल्या जिल्ह्यांमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी याची आखणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे करता येईल त्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे भाजप प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय म्हणाले.

मराठा आरक्षणप्रश्नी सर्व नेत्यांनी एकत्र यावे : खा. संभाजीराजे
मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खा. संभाजीराजे यांनी गुरुवारी शरद पवार व राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वच प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केलेे. शुक्रवारी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तर शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतील.

मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीचीच रसद
मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी रसद पुरवली आणि आता आरक्षण घालवल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कुणी आंदोलन करत असेल तर त्याला घाबरून निव्वळ अफवा पसरवण्याचे उपटसुंभ धंदे सचिन सावंत यांनी बंद करावेत. -केश‌व उपाध्ये, प्रवक्ते भाजप

आंदोलनामुळे कोरोनाचा भडका उडाल्यास भाजप जबाबदार
मराठा आरक्षणाविरोधात लढणाऱ्या “सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’चे भाजप व संघाचे नागपूर कनेक्शन उघड असून या न्यायालयीन लढाईत आरक्षणविरोधी लोक व संस्थांना रसद पुरवून भाजपनेच दगाबाजी केली आहे का? ५ जूनच्या आंदोलनामुळे कोरोनाचा भडका उडाला तर भाजप जबाबदार असेल. - सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

विनायक मेटेंची टीका
शरद पवार यांनी मराठा आरक्षणप्रश्नी ठाम भूमिका कधीच घेतलेली नाही. संभाजीराजे पवार यांना भेटून काय साध्य होणार आहे, असा सवाल आमदार मेटे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...