आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये बावनकुळेंच्या स्वागताची जय्यत तयारी:जि.प निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर​​​​​​​; बावनकुळे नारळ फोडण्याबरोबर वाजणार निवडणूकीचा ढोल

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्याची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच नाशकात येत असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी जय्यत तयारी केली असून गणेशोत्सवामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आता ,आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे हे एक प्रकारे प्रचाराचा नारळ फोडण्याबरोबर निवडणूकीचा ढोल वाजवणार असल्याचे चित्र आहे.

बाईक रॅली द्वारे शहरात आगमन

राज्यात सत्ता आल्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते कमालीचे चार्ज झाले असून पाठोपाठ प्रदेशाध्यक्षपदाची खांदेपालट करत बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी दिल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. पदभार घेतल्यानंतर ते प्रथमच नाशकामध्ये येत असून रविवारी सकाळी ते नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांची बाईक रॅली द्वारे शहरात आगमन होणार आहे. साधारणपणे नाशिक रोड भागांमधील महत्त्वाच्या चौकांमध्ये ही बाईक रॅली जाणार असून त्यानंतर द्वारका, मुंबई नाका मार्गे कालिका माता मंदिर येथे समारोप होणार आहे.

रणनीतीसाठी कोअर कमिटीची बैठक

बावनकुळे हे शहर व जिल्हा अशी कोअर कमिटी सदस्यांची एकत्रित बैठक घेणार असून त्यामध्ये आगामी पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची रणनीती आखली जाणार आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता असताना केलेली विविध विकास कामांबाबतही अशा पद्धतीने लोकांपर्यंत प्रचार करायचा या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. या बैठकीला भाजपाचे पाचही आमदार शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच समिती सदस्य असणार आहेत.

कार्यकर्ता मेळाव्यात ठरणार 'नाशिक मिशन'

बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर थेट शरद पवार यांच्या बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये चढाई करण्याचे आव्हान दिले. ते ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडी मधील स्थानिक नेत्यांना आव्हान देत असल्यामुळे त्यांचे 'नाशिक मिशन' काय असणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, स्प्लेंडर हॉल येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून त्यात ते काय संदेश देत आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.

बावनकुळे यांच्या 'गुड बुक' मध्ये येण्याची धडपड

नवीन प्रदेशाध्यक्ष प्रथमच नाशिक मध्ये येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी होर्डिंग बॅनर लावण्यापासून तर लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नेत्यांची धडपड लपवून राहिली नाही. सडेतोड अशी प्रतिमा असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यापासून दूर असलेले पदाधिकारी बावनकुळे यांच्या गुडबुक मध्ये येण्यासाठी त्यांच्या नाशकामधील समर्थकांकडे गळ लावून बसल्याचेही चित्र होते.

बातम्या आणखी आहेत...