आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पाेज ​​​​​​​:दाेन्ही खासदार झाेपेतच; गेल्या वर्षीच आले हाेते उडाण मुदत समाप्तीचे पत्र

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकहून १ नाेव्हेंबरपासून अलायन्स एअर या कंपनीने नाशिक-अहमदाबाद, पुणे, बेळगाव आणि दिल्ली या शहरांची विमानसेवा बंद केली आहे. उडाण याेजनेची मुदत संपल्याने ही सेवा खंडित केली गेली. तरीही लाेकप्रतिनिधी चुप्पी साधून आहेत. आता मात्र विमान कंपनीने वर्षभरापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार व खासदार हेमंत गाेडसे यांना पत्र लिहून याेजनेची मुदत ३१ जानेवारी २०२२ लाच संपत असल्याने ही मुदत ३ वर्षांनी वाढवून मिळण्यासाठी सहकार्य करावे, अशा विनंतीचे पत्र लिहिले हाेते हे पत्रच ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहे.

नाशिकसारख्या शहराचा वेगाने विकास व्हावा, याकरिता विमानसेवा अत्यंत गरजेची आहे. ती सुरू व्हावी, याकरिता स्थानिक उद्याेजक संघटना व शहरातील काही प्रमुख संघटनांनी एकत्र येत, विमान कंपन्यांना निमंत्रित करून त्यांच्यासमाेर विविध प्रवासी क्षमतेची व मागणीची सर्वेक्षण मांडून ही सेवा सुरू करण्यात सर्वात माेठे याेगदान दिले. केंद्र सरकारने टायर टू शहरांना जाेडण्यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ ही याेजना आणली व त्याचा परिणाम म्हणून नाशिकहून नाशिक-हैदराबाद, अहमदाबादकरिता दाेन तर दिल्ली करिताही दाेन कंपन्यांच्या विमानसेवा सुरू झाल्या.

अलायन्स एअरने यानंतर हैदराबादची सेवा बंद केली असली तरी स्पाइस जेटकडून दिल्ली आणि हैदराबादची सेवा नियमित सुरू आहे. मात्र, अलायन्सचे चार प्रमुख शहरांकरिताची सेवा केवळ उडाण याेजनेची मुदत संपत असल्याने बंद केल्याचे समाेर आल्यानंतर नाशिककरांची भावना संतप्त असून आपले केंद्रीय राज्यमंत्री, दाेन खासदार, अठरा आमदार काय करत आहेत? असा प्रश्न ते उपस्थित करू लागले आहेत.

कंपनीने केली हाेती ३ वर्षांसाठी मुदतवाढीची मागणी
अलायन्स एअरने केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार आणि खासदार हेमंत गाेडसे यांना १३ आॅक्टाेबर २०२१ ला दिलेल्या पत्रात ३१ जानेवारी २०२२ राेजी उडाण याेजनेची अलायन्स एअरच्या मार्गांकरिताची मुदत व भारत सरकार व एचएएल यांच्यातील करारही संपत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

निवडणूकांमुळे पळवापळवी
नाशिकसारख्या क्षमता आणि कंपन्यांना व्यवसाय असतानाही केवळ इतर राज्यातील निवडणुका लक्षात घेता नव्या शहरांतून विमानसेवा घाईघाईत सुरू केल्या जात आहेत व नियमित सुरू असलेल्या सेवा बंद हाेत असल्याचा थेट आराेप आता हाेत आहे. केंद्रीय नागरी विमानउड्डयण मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांच्या ग्वाल्हेर आणि इंदाेर येथे तसेच दुसऱ्या एका राज्याकरिता नाशिकची विमाने वळविण्यात आल्याचे बाेलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...