आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटी लिंक बस 59 टक्के तोट्यात:50 नवीन बसेस सुरू करण्यास ब्रेक; 20 रुपये प्रति कमी उत्पन्न असलेले मार्गावरील बसेस होणार बंद

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन बस सुरू झाली की प्रति दिन किमान दोनशे किलोमीटर याप्रमाणे प्रवासी मिळो ना मिळो सिटीलींककडून ठेकेदाराला भाडे सुरू होणार असल्याच्या विचित्र कराराचा फायदा घेत गरज नसताना नवीन बसेस वाढवण्याच्या उद्योगाला अखेर आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी ब्रेक लावला असून त्यामुळे आता 43 नवीन बसेसचा मार्ग बंद झाला आहे. एवढेच नव्हे तर आयुक्त पवार यांनी 20 रुपये प्रति कमी उत्पन्न असलेले मार्गावरील बसेस बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.

उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग कोणते याचे सर्वेक्षण करण्याबरोबर नाशिक शहरालगत ग्रामीण भागांमध्ये फायद्याचे मार्ग कोणते हेही शोधण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्वावर खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून सिटीलींक ही बससेवा सुरू करण्यात आली असून पहिल्या दिवसापासून बस सेवा तोट्यात आहे. 8 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत जवळपास तीस कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

एकीकडे तोटा वाढत असताना दुसरीकडे शहरांमध्ये नवीन बसेस वाढवण्याचा सपाटा सुरू होता. 8 जुलै 2021 रोजी पहिल्या टप्यात 50 बसेस सुरू केल्यानंतर सद्यस्थितीत 50 मार्गावर 205 बसेस धावत आहेत. तर दैनंदिन प्रवाशांची संख्याही 65 हजारांवर पोहचली आहे. मात्र , अद्यापही अनेक मार्गावरील बसेस कमी क्षमतेने धावत असल्यामुळे तोटा वाढत आहे.

मुळात, बसेसची संख्या वाढवण्यापूर्वी ज्या फेऱ्या तोट्यात आहे, त्यांचा अभ्यास करून तेथील बसेस ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक आहे तेथे वळवण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी दिले होते. मात्र, असे केले तर ठेकेदाराच्या बसेस पूर्ण क्षमतेने सुरू होणार नसल्याचे लक्षात घेत नवीन बसेस वाढवण्याचे सत्र सुरूच राहिले. या सर्वांचा परिणाम म्हणून सद्यस्थितीमध्ये प्रति किमी सरासरी 77 रुपये ठेकेदाराला दिले जात असताना त्या बदल्यात केवळ 35 ते 37 रुपये प्रति किमी वसूल होत आहे. त्यामुळे पालिकेचा तोटा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक वाढला आहे. त्यात इंधनाचे दर वाढल्यामुळे किमान, दरमहा 5 कोटी रुपये पालिकेला बससेवेपोटी द्यावे लागत आहे.

ही सर्व बाब लक्षात घेत आयुक्त पवार यांनी, मंगळवारी सिटी लिंकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून 20 रुपये प्रति किमी इतके उत्पन्न असलेले मार्ग कोणते याचा अभ्यास करून येथील बसेस कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या 205 बसेस अतिरिक्त एकही नवीन बस जोपर्यंत आवश्यकता भासत नाही, तोपर्यंत सुरू करू नये असे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...