आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट नोकरभरती:पालिकेत नोकरभरतीचा बिगुल; पाच वर्षांनंतर सेवा प्रवेश नियमावली मंजुरीच्या हालचाली

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील अडीच ते तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचा अर्थातच नोकरभरती करण्याचा मार्ग लवकरच खुला होण्याची शक्यता असून गेल्या पाच वर्षांपासून राज्याच्या नगरविकास विभागाकडे पडून असलेल्या नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावली व बिंदू नियमावलीच्या प्रस्तावाची अखेर शासनस्तरावर छाननी सुरू झाली आहे.

महापालिकेच्या आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे आवश्यक माहितीचे सादरीकरण केले आहे.‘क’ वर्ग आकृतिबंधानुसार महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७०९२ मंजूर पदे असून नानाविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांत अधिकारी, कर्मचाऱ्यांची २६००हून अधिक पदं रिक्त आहेत. सद्यस्थितीत ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून त्यांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाज करताना तणावाचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे थेट नोकरभरती करता येत नाही. त्याबरोबरच २०१७ मध्ये सेवा प्रवेश नियमावली प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवल्यानंतरही मंजुरी मिळत नसल्यामुळे नाेकरभरतीमध्ये अडथळे येत होते.

मध्यंतरी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी त्यावेळीचे नगर विकासमंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतः संपर्क साधत सेवा प्रवेश नियमावलीचा प्रलंबित प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले होते. प्रस्तावाची नगरविकास विभागाकडून छाननी सुरू असून आस्थापना विभागातील प्रतिनिधीने मंत्रालयात माहितीचे सादरीकरण केले.

वैद्यकीय, अग्निशमनची भरती होणार : महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने गेल्यावर्षी आरोग्य-वैद्यकीय, अग्निशमनसह अत्यावश्यक सेवेशी संबंधित ८७५ नवीन पदांना मंजुरी दिली होती. त्यापैकी किमान आस्थापना खर्चाची अट वगळून भरतीसाठी ३४८ पदांना मंजुरी दिली गेली. मात्र, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे अडचण होती. ही नियमावली मंजूर झाल्यास वैद्यकीय व अग्निशामन विभागाची भरती होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.