आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
(मनाेहर घाेेणे)
देशासाठी अहाेरात्र झटणाऱ्या सैनिकांप्रति देशवासीयांना माेठा अभिमान आहे. याचाच गैरफायदा राजस्थान व उत्तर प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या भरतपूर येथील चाेरट्यांनी सैनिकांच्या नावांची बनावट ओळखपत्र बनवून देशभर हैदाेस घातला आहे. ओएलएक्स या खरेदी-विक्री करणाऱ्या अॅप्सच्या माध्यमातून नाशिकसह मुंबई, पुणे, धुळे अशा राज्याच्या सर्वच भागातील ग्राहकांची या टाेळक्याकडून फसवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे या टाेळीत संपूर्ण गावच सहभागी असल्याने त्यांच्यावर पाेलिस कारवाई करण्यास धजावत नाहीत.
ओएलएक्स या खरेदी-विक्री करणाऱ्या अॅपवर सुस्थितीत असलेल्या वाहनांचा फाेटाे भारतीय सैन्य व सीमा सुरक्षा दलातील जवानांच्या नावाने टाकले जातात. वाहनांची किंमतदेखील कमी टाकली जाते. त्यामुळे आपसूकच ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकताे. ग्राहकाचा विश्वास संपादित करण्यासाठी बदली झाल्याचे कारण पुढे करून जवानाचे ओळखपत्र, कॅन्टीन कार्डदेखील पुराव्यादाखल टाकले जाते. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ग्राहकास लाॅकडाऊनमुळे मी येऊ शकत नसल्याचे कारण पुढे करून फाेन पे, पेटीएम, गुगल पे यांसारख्या अॅप्सवरून पैसे टाकण्यास सांगितले जाते. त्यानंतर कुरिअर कंपनीच्या माध्यमातून वाहन पाठविण्याचे आश्वासन दिले जाते. पैसे प्राप्त झाल्यानंतर मात्र त्यांचा संपर्क बंद हाेताे व त्यानंतर फसवणूक झाल्याचे ग्राहकाच्या लक्षात येते.
फेसबुक व व्हाॅट्सअॅपच्या डीपीवरून घेतले जातात सैनिकांचे फाेटाे
ग्राहकांना सैनिक असल्याचे भासवण्यासाठी फेसबुक व व्हाॅट्सअॅपच्या डीपीवर असलेल्या सैनिकांच्या फाेटाेचा या चाेरट्यांकडून वापर केला जाताे. फाेटाे शाॅपच्या माध्यमातून सैन्यदलाचे ओळखपत्र तयार करून त्यावर ताे फाेटाे टाकण्यात येताे. त्यामुळे ग्राहकाचा त्वरित त्यावर विश्वास बसताे व लगेचच ग्राहक त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकतात.
पाच हजार रुपयात मिळते अॅक्टिव्हेट सिमकार्ड
यासाठी वापरण्यात येणारे सिमकार्ड पाच हजार रुपयात अॅक्टिव्हेट करून मिळतात. उत्तर प्रदेशातील आग्रा, मथुरा येथे हे सिमकार्ड मिळते. यासाठीदेखील एक स्वतंत्र टाेळी कार्यरत आहे.
संपूर्ण गावाचा सहभाग
उत्तर प्रदेश व राजस्थानच्या सीमेवर असलेल्या भरतपूर या गावातील बहुतांश लाेक या टाेळीत कार्यरत आहेत. या ठिकाणी तपासासाठी गेलेल्या पाेेलिसांना संपूर्ण गाव आडवे हाेते. स्थानिक पाेलिसांचीही मदत मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव पाेलिसांना माघारी फिरावे लागत असल्याची माहिती सायबर पाेलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
तक्रार दाखल करण्यास पोलिस करतात टाळाटाळ
सैनिकांच्या नावाचा वापर करून फसवणूक करण्याची पद्धत सध्या सुरू आहे. माझी अशाचप्रकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी तत्काळ तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो. मात्र, पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. - यतिन चौधरी, धुळे
अनाेळखी व्यक्ती असल्यास आॅनलाइन पैशांचा व्यवहार करू नये
काेराेनामुळे आॅनलाइन अॅक्टिव्हिटी माेठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सैनिकांच्या फाेटाेचा वापर करून फसवणूक करण्याचे चार ते पाच प्रकार आपल्याकडे घडले आहेत. नागरिकांनी आॅनलाइन व्यवहार करताना ओळखीची व्यक्ती असेल तरच पैसे द्यायला हवे. जाेपर्यंत वस्तू ताब्यात मिळत नाही ताेपर्यंत अनाेळखी व्यक्तींशी पैशाचा व्यवहार करू नये. - पाैर्णिमा चाैगुले, पाेलिस उपायुक्त
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.