आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरीतील घटना:गरीबीचा गैरफायदा घेऊन मेंढपाळांनी केली होती गौरीची खरेदी

इगतपुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने अवघ्या तीन हजार रुपयांत तीन वर्षापूर्वी मेंढ्या चारण्यासाठी दिलेल्या पोटच्या चिमुरडीला मेंढपाळांनी आठवड्यापूर्वी चटके व गळफास देत बेदम मारहाण करत घरासमोर टाकून देत पलायन केले. बेशुद्धावस्थेतील सात दिवसांपासून जन्मृ मृत्यूशी संघर्ष सुरु होता. अखेर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील माळरानावरील आदिम कातकरी समाजाची ही मुलगी असून या घटनेनेखळबळ उडाली आहे. दोन याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. संगमनेर पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

तुळसाबाई सुरेश आगिवले यांनी तीन वर्षांपूर्वी गौरीला (१०) घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संशयित आरोपी विकास सीताराम कुदनार (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठवले होते. त्यानंतर आठवड्यापूर्वी गौरी हिस संशयितांनी प्रचंड मारहाण केली. कुदनार व त्याच्या साथीदारांनी २७ ऑगस्टला मध्यरात्री गौरीला उभाडे येथील तिच्या झोपडीवजा घराजवळ टाकून पलायन केले. जागे झाल्यावर तुळसाबाई बाहेर गेल्या असता त्यांना धक्का बसला. लाल चादरीमध्ये बेशुद्धावस्थेत असलेली मुलगी गौरी असल्याचे समजताच त्यांनी हंबरडा फोडला. आवाज ऐकून वस्तीमधील काही कुटुंबातील सदस्यांनी तिला घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, तालुका अध्यक्ष गोकुळ हिलम, सचिव सुनील वाघ यांना घटना समजताच त्यांनी तिला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, सात दिवसांच्या उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला.

असे चालते रॅकेट : पैशाची लालूच दाखवून होते वेठबिगारी आदिम कातकरी समाजाची इगतपुरी तालुक्यात जवळपास १४०० कुटुंबे राहतात. यातील काही वीटभट्टी, खडी फोडणे, मासेमारी करून उदरनिर्वाह करत असतात. गावकुसाला अथवा माळरानावर राहणाऱ्या कुटुंबियांना पैशांची लालूच दाखवून विविध कामाला घेऊन त्यांना बंधबिगारीला लावले जाते. तालुक्यातील अनेक जोडपे तसेच लहान बालकांना वेठबिगारीसाटी नेऊन मानसिक व कौटुंबिक त्रास दिला जातो. याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करून यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची मागणी पुढे येत आहे.

यापूर्वीही अशा घटना, अधीक्षकांकडे कारवाईची मागणी काही मेंढपाळ हे पैशाचे आमिष दाखवून लहान बालके मेंढ्यांसोबत घेऊन जात त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करतात. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संशयितांवर कठोर कारवाई ^घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून माहिती समजताच घोटी पोलिसांना तपासाचे आदेश दिले. संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल. गुन्हा संगमनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सचिन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...