आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात पडताळणी:बारावीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी मंडणगड पॅटर्ननुसार काॅलेजातच

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे उत्तीर्ण झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शुल्क प्रतिपूर्तची सवलत दिली जाते. परंतु, त्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ही प्रक्रिया वेळेत केली जात नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, त्यांच्या हितासाठी नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने थेट महाविद्यालयांतूनच या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून दिली जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अभियांत्रीकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फॅार्मसी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी आणि शिक्षण शुल्काची प्रतीपूर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. पण इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी वेळेत त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे दाखल करीत नाहीत. त्यामुळे त्यांना सवलतीचा लाभ मिळत नाही.

ही अडचण विचारात घेऊन तसेच विद्यार्थ्यांचा त्रास कमी होण्याच्या दृष्टिने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे. त्याकरीता संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरून सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी.

पॅटर्ननुसार १ ते ३१ डिसेंबरदरम्यान शिबिर
जिल्ह्यातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांच्या वतीने १ ते ३१ डिसेंबरदरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होईल.

बातम्या आणखी आहेत...