आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर:‘शिकार’ आली ‘अंगलट’ : विहिरीत पडल्यानंतर बिबट्याच्या अंगाखांद्यावर खेळत बसले मांजर!

सिन्नर / भरत घोटेकर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकारी आणि शिकार असे दोघेही अडचणीत आले की काय होऊ शकते याचे आगळेवेगळे उदाहरण सिन्नर तालुक्यात कणकोरी येथे पाहावयास मिळाले. झाले असे की, तालुक्यातील कणकोरी येथे मांजराची शिकार करण्याच्या नादात बिबट्या आणि मांजर दोघेही एका विहिरीत पडले. तीन परस पाणी आणि विहिरीच्या केवळ एका बाजूला असलेले कठडे या दोन्हींमध्ये जीवनमरणाचा खेळ सुरू असताना बिबट्याने वैरभाव सोडला. शिकार करण्याचे टाळले आणि दोघांनीही विहिरीच्या एका कठड्याचा आधार घेतला. जीवन-मरणाच्या खिंडित अडकताच बिबट्याने आपल्याच ‘मार्जार’ कुळातील मांजराला जीवदान दिले. मांजरानेही मग बिबट्याच्या अंगाखांद्यावर खेळायला सुरुवात केली. ज्याची शिकार करण्यास बिबट्या विहिरीत पडला तेच मांजर बिबट्याच्या अंगाखांद्यावर खेळताना पाहून अनेकांना या वेळी जगण्याच्या संघर्षात मैत्रीचा धागा जुळल्याचे चित्रण असलेल्या “लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाची आठवण झाली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा टाकून शर्थीचे प्रयत्न करत पाच तासांच्या प्रयत्नानंतर या दोघांनाही विहिरीबाहेर काढले.

शनिवारी मध्यरात्रीनंतर शिकारीसाठी मांजराचा पाठलाग करणारा बिबट्या मांजरीसह विहिरीत पडला असावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. गणेश सांगळे यांच्या शेतात कठडे नसलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या डरकाळ्यांनी रविवारची सकाळ दणाणून सोडली. लोकांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा बिबट्या आणि मांजर दिसले. रामनाथ सांगळे यांनी ही माहिती वन विभागाला कळवली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे, सुधीर भोकडे, वनरक्षक रवी गवळी, आकाश रूपवते, किरण गोर्डे आदींसह वन विभागाचे अधिकारी दाखल झाले. बिबट्या काही केल्या पिंजऱ्यात येत नव्हता. दुपारी ४ च्या सुमारास चौथ्यांदा विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला आणि पाठोपाठ मांजरालाही दोरखंडाला बादली बांधून ती विहिरीत सोडून बाहेर काढण्यात आले. पाच तासांच्या प्रयत्नांना अखेर अशा प्रकारे यश आले.

...म्हणून टाळली असावी त्याने शिकार
मार्जार कुळातील प्राणी जास्त भुकेला असेल तरच छोटी शिकार करतो. इतर वेळी मात्र तो आपल्या वजनाच्या ७० टक्के वजन असलेल्या प्राण्यांची शिकार करतो. कदाचित आपल्या कुळातील प्राणी असल्याने विहिरीत पडलेल्या बिबट्याने मांजराची शिकार टाळली असावी. - मनीषा जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर.

बातम्या आणखी आहेत...