आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सीबीआय, ईडी अन् पावसाळी अधिवेशनात आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव

नाशिक / दीप्ती राऊत6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारची केस तयार करण्याची भाजपची तयारी, परबांसह काही मंत्री रडारवर

परमबीरसिंगांच्या याचिकेतून सीबीआय तपासणीची मागणी, किरीट सोमय्यांच्या पत्रातून ईडी, आयकर विभागाच्या धाडी आणि अखेरीस दोन महिन्यांनी येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव या दिशेने भारतीय जनता पक्षाची महाविकास आघाडी सरकारविरोधातील रणनीती असल्याचे कळते. सचिन वाझे व मनसुख प्रकरणावरून उपस्थित झालेला राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर मुद्दा येत्या दोन महिन्यांत धगधगत ठेवत एकीकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत येत्या काळात अनिल परब यांच्यासह आणखी काही मंत्री भाजपच्या रडारवर आहेत. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी भाजपने धार तीव्र केल्याने पूजा चव्हाण प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. वाझे प्रकरण, मनसुख हत्या आणि परमबीरसिंगांच्या तक्रारीमुळे गृहमंंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. आता त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत मैदानात उतरला आहे. राज्यपालांनी मुख्यमंंत्र्यांकडून अहवाल मागवून राष्ट्रपतींकडे पाठवण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंंटीवार यांनी केली आहे. अँटिलियाचा तपास एनआयएच्या निमित्ताने केंद्राच्या हातात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गृहमंत्र्यांच्याबाबतच्या तक्रारींमध्ये सीबीआय उतरली तर तो तपासही केंद्र सरकारच्या हातात जाईल आणि मग गृहमंत्र्यांना पायउतार होण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी “वाझेंच्या वसुली गँगचे लाभार्थी’ म्हणत परिवहनमंत्री अनिल परब यांच्या चौकशीची मागणी केली आहे. केवळ गृह मंत्रालयच नाही तर परब हे गृहनिर्माण मंत्रालयातही हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करून ६०० कोटींच्या घोटाळ्याचा प्रचार सुरू केला आहे. या साऱ्यातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर ईडी, आयकर विभागाच्या धाडी टाकत दोन महिने सरकारच्या अपयशाची ही “केस’ तयार करण्याच्या तयारीला वेग आल्याचे कळते.

१०० कोटींमुळे देशमुख अडचणीत, ६०० कोटींचा रोख कुणाकडे?
विरोधकांच्या निशाण्यावर असलेले शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परबांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तलवार परजली आहे. परब हे केवळ गृह खातेच नाही तर गृहनिर्माण खात्यातही “हस्तक्षेप’ करीत असल्याचा आरोप सोमय्या यांनी नाशिक येथे केला. २ मार्च रोजी एका एसआयएच्या प्रकरणात सकाळी काढलेला आदेश कोणाच्या हस्तक्षेपाने दुपारी साडेतीन वाजता बदलण्यात आला आणि त्यातील ६०० कोटी कोणी लंपास केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांचा रोख परब यांच्याकडे असून वाझेंच्या वसुली गँगच्या लाभार्थींचा शोध ईडी आणि आयकर खात्यामार्फत एनआयएने करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...