आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:पालिका कर भरणा केंद्रांवर आता सीसी कॅमेऱ्यांची नजर; नाशिकरोड केंद्रावरील अपहारानंतर आली जाग

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची आर्थिकस्थिती नाजुक असताना एकीकडे उत्पन्न गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे तर दुसरीकडे काही कर्मचारी कररूपात गोळा होणाऱ्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे उघड झाल्याने आता पालिकेने शहरातील सर्व कर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकरोड व गांधीनगर केंद्रात लाखोंचा अपहार झाल्यानंतर पालिकेला जाग आली हे विशेष.

मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी सोपेपणा यावा यासाठी कर भरणा केंद्र तयार केले आहेत. या ठिकाणी पालिकेचे जबाबदार कर्मचारी तैनात आहे, परंतु नाशिकरोड व गांधीनगर केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पासवर्डचा गैरवापर करत लाखोंचा अपहार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. केंद्रातील सॉफ्टवेअरशी छेडछाड करून हा अपहार केला गेल्याचे दिसत आहे. याप्रकरणी एका कर्मचाऱ्याला निलंबित करून आयुक्त रमेश पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, करवसुली विभागाने लेखापरीक्षण विभागाकडून या प्रकारासंदर्भात माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांवर बारीक नजर ठेवता यावी यासाठी प्रशासक पवार यांनी सर्व कर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचे आदेश दिले. या कॅमेऱ्यांद्वारे केंद्रात येणाऱ्या नागरिकांबरोबरच संबंधित कर्मचाऱ्यांवरही विभागीय अधिकारी तसेच मुख्य कार्यालयातून नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान, चौकशी अहवाल आयुक्तांना दिल्यानंतर जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच फौजदारी गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.