आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बिबट्याच्या 3 बछड्यांवर सीसीटीव्हीची नजर

नाशिक, इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी गावातील नवले मळ्यात १५ दिवसांपूर्वीच नर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतरही वाडीचेरान मळ्यात बिबट्याची मादी व दोन बछड्यांचा वावर हाेता. डेमसे मळ्यात रविवारी (दि. ४) दुपारी उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे सापडले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछड्यांना याच ठिकाणी सुरक्षित ठेवत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

वाडीचेरान भागातील डेमसे व जाचक मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाथर्डी गावातील मळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून नवले मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता.

याच पिंजऱ्यात २० नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी एक नर बिबट्या जेरबंद झाला. पाथर्डी गावातील स्थानिक शेतकऱ्यांना एक मादी व दोन बछड्यांचा वावर असल्याचे पाहावयास मिळाले. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या परिसरात पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी केली जात आहे.

परिसरात पिंजरा लावावा
वाडीचेरान परिसरात डेमसे मळा व जाचक मळा परिसरातच बिबट्याचा वावर असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याचा पाऊलखुणाही या भागात आहे. त्यामुळे वन विभागाने पुन्हा पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे. - सचिन जाचक, शेतकरी

दुपारी बिबट्याचे दर्शन
शेतीचा परिसर तसेच वालदेवी नदी जवळच असल्याने या भागात वारंवार बिबट्याचा वावर पाहावयास मिळतो. बिबट्याची मादी व तीन बछड्यांचा वावर आहे. त्यामुळे बिबट्याच्या भीतीच्या सावटाखालीच आम्हाला शेतीची कामे करावी लागतात. -ज्ञानेश्वर डेमसे, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...