आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच चांगलीच भोवली:केंद्रीय जीएसटी कार्यालय अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके याला 3 दिवसांची कोठडी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्याेजकाचे जीएसटी खाते बंद पडल्याने ते पुन्हा कार्यान्वित करण्याच्या माेबदल्यात ८ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने अटक केलेल्या सिडकाेतील केंद्रीय जीएसटी कार्यालयातील अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची सीबीआय पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

विशेष म्हणजे सीबीआय पथकाने चव्हाण याच्या घर झडतीत सुमारे दोन लाखांची रोकड व इतर मालमत्ता, कागदपत्रे जप्त केली आहेत.

अशी केली कारवाई

निफाड तालुक्यातील एका उद्याेजकाकडून ८ हजारांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी (दि. २६) चव्हाणके यास त्रिमूर्ती चौकातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात रंगेहाथ पकडले. सीबीआयच्या मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून नाशिकमध्ये ही कारवाई केली.

नेमके प्रकरण काय?

निफाड तालुक्यात व्यवसाय असणाऱ्या एका उद्याेजकाचे तांत्रिक कारणास्तव नियमित चालू असलेले केंद्रीय जीएसटीचे खाते बंद पडले हाेते. हे खाते सुरू करण्यासाठी उद्याेजकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन अर्ज दाखल केल्यावरही त्यात काहीतरी त्रुटी दाखवून ते खाते पूर्ववत हाेत नव्हते. यासाठी तक्रारदार उद्याेजकाने सिडकाेतील कार्यालयात निफाड तालुक्याचे जीएसटी खाते बघणाऱ्या अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके याला भेटून खाते सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला हाेता.

चव्हाणकेची टाळाटाळ

चव्हाणके याने खाते सुरू करण्यासाठी टाळाटाळ करत तक्रारदारकडे हे खाते पूर्ववत सुरू करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त ८ हजारांची रक्कम मागितली. दरम्यान, यासंदर्भात तक्रारदार उद्याेजकाने थेट मुंबईतील सीबीआयच्या एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

दोन लाख रोकड हाती

सीबीआयच्या पथकाने चव्हाण याच्या पाथर्डी फाटा येथील निवासस्थानी टाकलेल्या झडती सत्रात दोन लाख रुपयांची रोकड व काही मालमत्ता संबंधित कागदपत्रे हाती लागले आहेत. तसेच चव्हाण यांच्या कार्यालयातील कपाटात देखील 38 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

सुनावणीत काय झाले?

लाचखोर चव्हाण याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तपासी पथकाने ही रक्कम आणखी कोणा इतर व्यापारी उद्योजकांकडून लाचेच्या स्वरूपात स्वीकारली आहे का? या संबंधित चौकशी करायची असल्याने न्यायालयात पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यावर चव्हाणके याच्यावतीने अ‌ॅड. राहुल कासलीवाल यांनी कागदपत्र व माहिती घेतली असल्याने पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून चव्हाणके याला 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...