आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना काय त्रास आहे, हे विचारले पाहिजे. आजाराचा पूर्व इतिहास विचारला पाहिजे. जात विचारल्यानंतर काय वेगळे औषध देणार आहेत का? असा संतप्त सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
जातीचा उपचार कोण करत आहे आणि कोणी करायला सांगितला आहे, हे विचारले पाहीजे असे ते म्हणाले. शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांना व प्रफुल्ल पटेल यांना माहीत असावे. मी कोर्टात गेलो होतो. तिकडून आल्यावर मला कळल्याचे त्यांनी सांगितले.
नक्की प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावर नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर शनिवारी छगन भुजबळ नाशिकला परतले. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात केस पेपरवर रुग्णांना जात विचारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावर भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
तसेच शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी संपूर्ण घडामोडीत नव्हतो, पवारसाहेबांना जेव्हा विचारले तेव्हा त्यांचे म्हणणे होते, मी सांगितले असते तर तुम्ही राजीनामा देऊ दिला नसता, म्हणून विचारलं नाही. अजितदादांना माहीत हाेते असे मला वाटते, प्रफुल्ल पटेल यांनाही माहीत असावे, बाकीच्यांना माहीत नसावे. मी कोर्टात गेलो होतो. नंतर कळल्यावर धक्का बसला. हे प्रकरण विशेषतः त्यांच्या घरच्यांना माहिती होते, हे नक्की. पवारसाहेबांसारखे नेते एकाएकी असे निर्णय घेत नाहीत, हे नक्की!’
वज्रमूठ सभेबाबत नेते निर्णय घेतील
रद्द झालेल्या वज्रमूठ सभेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, इतर नेतेमंडळी निर्णय घेतील, त्या समितीमध्ये मी नाही, उष्णतेने लोक गेले ती भीती आहे. त्यामुळे सभा पुढे ढकलल्या. रद्द झालेल्या नाहीत.
दोन्ही बाजूंनी विचार व्हावा
बारसू प्रकल्पाबाबत भुजबळ म्हणाले, बारसू उद्योग आला पाहिजे की नाही, दोन मुद्दे आहेत. असे जे उद्योग येतात हे उद्योग यावे की नाही, येथील आंब्यांच्या झाडांचे काय होणार, पर्यावरणाचे काय होणार याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. यात राजकारण आणण्याचा प्रयत्न काेणी करू नये. प्रदूषणाचा धोका काय आहे. नुकसान काय आहे, याचे मोजमाप केले पाहिजे. उगीच विरोध करायला नकाे. जबरदस्ती लोकांवर प्रकल्प लादू नये.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.