आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांची ग्वाही:कोर्टात लवकरच इम्पिरिकल डेटा सादर करु, मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने समर्पित आयोग स्थापन केला आहे. आयोग आणि सरकारमध्ये समन्वय आहे. त्यामुळे लवकरच इम्पेरिकल डेटा गोळा करुन तो सुप्रीम कोर्टाला सादर करु, अशी माहिती आज राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच, मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ओबीसीसोबत एससी, एसटीचे सर्वेक्षण?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर राज्यातील समर्पित आयोगामार्फत ओबीसींसोबत एससी आणि एसटी समाजाचेही सर्वेक्षण केले जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मागासवर्गीय संघटनांकडूनही तशी मागणी केली जात आहे. यावर ओबीसीसोबत एससी, एसटी सर्वेक्षण होणार असल्याबाबत आपल्याला अद्याप कल्पना नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

केंद्राने जीएसटी सोडून द्यावा!

जीएसटीची सर्व थकबाकी राज्यांना दिल्याचे प्रसिद्धी पत्रक केंद्र सरकारने जारी केले आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकारने आक्षेप घेत राज्याचे 15 हजार कोटी अद्याप मिळालेले नसल्याचे म्हटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले असून छगन भुजबळ यांनीदेखील केंद्रावर टीका केली आहे. केंद्राने काही वर्षांची थकबाकी दिली आहे. पुर्ण थकबाकी दिली नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. केंद्राने सर्व थकित जीएसटी राज्य सरकारला द्यावा व यानंतरही वेळेत राज्यांकडे निधी द्यावा अथवा केंद्राने जीएसटी सोडून द्यावा. राज्य सरकार त्यांचे त्यांचे टॅक्स गोळा करेल, असे भुजबळ म्हणाले.

केंद्र सरकारच्या इंधन दर कपातीवरही भुजबळ यांनी टीका केली. केंद्राची कपात म्हणजे आधी सर्व कपडे काढून घ्यायचे व नंतर लंगोट देण्यासारखा प्रकार आहे. केंद्र सरकार 50 रुपयांचे सव्वाशे रुपये करते व नंतर 10 रुपये कमी करते, हा प्रकार सोपा आहे आणि केंद्र सरकार याचप्रकारे कपात करत असल्याची टीका भुजबळ यांनी केली.

अन् महंतांप्रमाणे उचलला बूम

पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने हनुमान जन्मस्थळावरून चालू असलेल्या वादाबाबत छगन भुजबळ यांना प्रश्न केला. त्यावर समोरील बूम उचलून भुजबळ यांनी पत्रकारावर हात उगारण्याचा अभिनय केला व हनुमान जन्मस्थळाबाबत तुमच्या मनात काही शंका आहे का? असा सवाल केला. काल नाशिकमध्ये झालेल्या धर्मसभेत महंतांनी गोविंदानंद यांच्यावर अशाच प्रकारे बुम उगारला होता. त्याचीच नक्कल भुजबळांनी केली. त्यावरून पत्रकार परिषदेत चांगलाच हशा उडाला. तसेच, देवाचा जन्म कुठे झाला यावर वाद घालून उगीच पोलिसांना ताप का देतात, असा सवालही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...