आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिन्नर - शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्च २०२३ अखेरपर्यंत काम पूर्ण हाेणार आहे. गुरेवाडी फाटा ते गुलमोहर हॉटेल हा बाह्यवळण रस्ता येत्या १५ दिवसांत खुला होणार आहे. तर पिंपरवाडी येथील टोलनाकाही जानेवारी अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन मॉन्टे कार्लो कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असल्याचे तांत्रिक प्रबंधक दिलीप पाटील यांनी सांगितले. साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ७ मीटर रुंदीच्या स्वतंत्र पालखी मार्गासह ५० किलोमीटर रस्त्याचे कामही ८५ टक्क्यांपर्यंत टप्प्यात पोहोचले आहे. यामुळे अर्धा ते पाऊण तास वाचणार असून याचा नाशिककरांनाही फायदा हाेणार आहे.
पालखी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षात साईभक्तांचा प्रवास सुखकर होणार असून रस्ता रुंदीकरणामुळे अपघातांनाही ब्रेकलागणार आहे. नाशिक - पुणे आणि नाशिक - शिर्डी हे दोन महामार्ग गुरेवाडी येथे वाय- आकाराच्या फ्लाय ओव्हरने जोडण्यात आले आहेत. गुरेवाडी भागातून जाणाऱ्या सिन्नर- पुणे महामार्गाला सिन्नर - शिर्डी महामार्ग वळण रस्त्याद्वारे जोडला आहे. मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील गुलमोहर हॉटेलजवळ उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण होताच मुंबई - नाशिक आणि पुण्यामार्गे येणाऱ्या साईभक्तांना सिन्नर शहरात येण्याची गरज पडणार नाही. सिन्नर - शिर्डी महामार्गाला हा वळण रस्ता गुलमोहर हॉटेल जवळ उड्डाण पुलाद्वारे जोडण्यात आला आहे. सावळीविहीर आणि पाथरे येथेही स्कायब्रिज बांधण्यात येत आहे. मुसळगाव, गुरेवाडी, वावी, पांगरी येथे प्रत्येकी एक बोगदा वाढविण्यात आला आहे. रस्ता चौपदरीकरण, पालखीमार्ग, स्काय वॉक, भक्तनिवास ही सगळीच कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक प्रबंधक दिलीप पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलतांना सांगितले.
अपघातांना लागणार ब्रेक सिन्नर -शिर्डी मार्गावरुन साईंच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालखीने जातात. दरवर्षी पायी दिड्यांना अपघात होण्याच्या घटना घडतात. त्यात अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले आहेत. स्वतंत्र पालखी मार्गामुळे अपघातांना ब्रेक लागणार असून साई भक्तांचा प्रवास सुरक्षीत होण्यास मदत होईल.
पिंपरवाडी शिवारात टोलनाका... : १०२६ कोटी रुपयांतून हा प्रकल्प उभा राहत आहे. ‘हायब्रीड ॲन्युटी मॉडेल्स’ (हॅम) तत्वावर अहमदाबाद येथील मॉन्टे कार्लो कंपनी या प्रकल्पाचे काम करत आहे. सिन्नर पासून २८ किलोमीटर अंतरावर वावीच्या पुढे पिंपरवाडी शिवारात टोलनाका उभारला जात आहे. गुळगुळीत रस्त्याच्या वापरासाठी वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे. टोलनाक्याचे स्ट्रक्चर पूर्ण झाले असून महिनाभरात यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
मार्च अखेरीस काम पूर्ण सिन्नर-शिर्डी वळण रस्त्यासह मुख्य शिर्डी मार्गाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. वावी, पांगरी येथील उड्डाणपूलांचे स्ट्रक्चर बांधून पूर्ण झाले असून भराव टाकण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. महामार्गाचे काम मार्च अखेर पूर्ण होईल. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्ग हिरवागार होईल. - दिलीप पाटील, तांत्रिक प्रबंधक एनएचएआय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.